- जितेंद्र दखने
अमरावती : जलजीवन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागणार असून, १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ६६१ पैकी ३१७ योजनांची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक गावांत वाड्या वस्त्यांवर पहिल्यांदाच नळ योजना आल्याने स्थानिक आबालवृद्धांसह चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य शासनाची फलश्रृती असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांनी स्वतः या योजनांच्या चाचणीचा आढावा घेतला आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत मेळघाटसह जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजना राबविली जात आहे. अतिदुर्गम, दुष्काळी तसेच वाड्यावस्त्यांना प्रतिमाणसी ५५ लिटर प्रतिदिन शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतून ६६१ गावांसाठी ६६१ योजनांची कामे घेण्यात आलेली आहे. यातील ५० टक्के कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामेही दिलेल्या मुदतीत पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ६६१ मधील ३१७ योजनांची यशस्वी चाचणी करण्यात आली असून या योजनेद्वारे संबंधित गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. पुढील काळात संबंधित योजनांची किरकोळ उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या योजनांच्या माध्यमातून वरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यातील काही गावांना पहिल्यांदा नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. जलजीवन योजनेमध्ये घर घर जल पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.
तालुकानिहाय योजना पूर्ण गावेअमरावती १६, अचलपूर ५३, भातकुली ०२,चांदूर रेल्वे १०, चांदूर बाजार ०६, चिखलदरा ६०, धामणगाव रेल्वे ३२, धारणी ८५, मोर्शी ०३, नांदगाव खंडेश्वर १२, तिवसा १४, वरुड २४ एकूण ३१७
मुख्यकार्यकारी यांच्या मार्गदर्शनात जलजीवन मिशनअंतर्गत कार्यात्मक नळजोडणी, जुन्या योजनेची सुधारणा व नवीन योजना अशी ६६१ कामे असून त्यापैकी ३१७ कामे पूर्ण झालेली असून त्याची यशस्वी चाचणी झालेली उर्वरित सर्व कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण नियोजन आहे.- संदीप देशमुखकार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागजिल्हा परिषद अमरावती