नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : सात दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे झालेल्या कॉलराच्या आजाराने तालुक्यातील पाचडोंगरी कोयलारी येथील चौघांचा मृत्यू झाला. तसेच ४०० च्या वर रुग्ण दाखल असताना मंगळवारी जिल्हा परिषद शाळेतील रुग्णांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपाशीपोटी राहायची वेळ आली.
विशेष म्हणजे, सोमवारी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. अंगणवाडी सेविकेने दाळ, तांदूळ डॉक्टरांजवळ दिले खरे, पण शिजवणार कोण, यावरच घोडे अडले अन् प्रशासनाचा गचाळ कारभार चव्हाट्यावर आला. नशीब, मोबाइल टॉयलेट आले आणि विद्युत बिल न भरता पाणीपुरवठा सुरू झाला.
दैनंदिन शेतीची व रोजंदारीची कामे ठप्प पडली आहेत. गावात आरोग्य, पोलीस, महसूल पाणीपुरवठा, विद्युत, जिल्हा परिषद, सर्व प्रशासन ठाण मांडून आहे. कोयलारी येथील पाणीपुरवठा योजना सात महिन्यांपूर्वी सुरू केली, विहिरीचे खोलीकरण असल्याने टँकरने पाणीपुरवठा झाला त्या मीटरवरून शेतकऱ्यांनी ओलितासाठी पाणी वापरले आणि ५०३४० रुपयांचे बिल आले. त्यासाठी विद्युत वितरण कंपनीने कुठलीच नोटीस न देता पुरवठा खंडित केला. चार जणांचा जीव गेल्यानंतर आता तो पूर्ववत केल्याने प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. आधीच तोडगा काढला असता तर जीव गेले नसते आणि शेकडो लोक आजारीही पडले नसते.
सोमवारी जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी दौरा केला. शाळेतच रुग्णांच्या जेवणाची सोय करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अंगणवाडी केंद्रातून डाळ व तांदूळ देण्यात आले. मात्र, ते शिजवणार कोण, हा प्रश्न होता. अखेर संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी स्वत: जेवण दिले. मागील सहा-सात दिवसांपासून येथील नागरिक अतिसारासारख्या आजाराशी झुंज देताहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत असली तरी काही विभाग या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.
मोबाइल टॉयलेट, जनरेटर, पाणीपुरवठा सारे ओक्के!
मंगळवारी मोबाइल टॉयलेट आले, जनरेटरची धूळ साफ झाली. कोयलारी व पाच डोंगरी येथील टाकी भरण्यात आली. नळातून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू झाला.
मंगळवारी जिल्हा परिषद शाळेत १२ रुग्ण होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्थित संदर्भात काल निर्देश दिले होते. परंतु सायंकाळपर्यंत जेवणाचे डबे आले नाहीत. त्यामुळे रुग्ण उपाशीपोटी आहेत.
डॉ. प्रवीण पारिसे, नोडल ऑफिसर पाचडोंगरी