लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारी ८०,६५८ वर पोहोचली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख गृहीत धरता दर ३५ नागरिकांमागे एक कोरोनाग्रस्त व दर ६६ पॉझिटिव्हमागे एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे. जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिला पॉझिटिव्ह व संक्रमिताच्या मृत्यूची पहिली नोंद झाल्यानंतर सातत्याने कोरोना संसर्ग वाढताच राहिला आहे. यानंतर सप्टेंबर महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली. यामध्ये ७,७१३ पॉझिटिव्ह व १५४ मत्यूची नोंद झाली. त्यानंतर मात्र, फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ मृत्यू. मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व तब्बल ४१० रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय मे महिन्यातील १४ दिवसांत तब्बल १३,९६१ पॉझिटिव्ह व २४७ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट साडेचार महिन्यांनंतरही कमी होताना दिसत नसल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी नव्हे, तर तिसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. या काळात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीदेखील २२ ते ३० दरम्यान राहिली आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट महापालिका क्षेत्रात, तर तिसरी लाट ही जिल्हा ग्रामीणमध्ये सुरू झाल्याची खुद्द आरोग्य विभागातच चर्चा आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने जिल्हा व आरोग्य प्रशासनाने आता तालुकास्तरावर व मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही किमान २५ ते ३० ऑक्सिजन बेडचे नियोजन केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
दुसऱ्या लाटेत ९१३ संक्रमितांचा मृत्यूकोरोनाच्या पहिल्या लाटेत १५४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मात्र, फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत तब्बल ९१३ संक्रमितांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. दरमहा संक्रमितांच्या मृत्यूचा आकडा वाढताच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,२१३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत दर ६६ रुग्णांमागे एकाचा मृत्यू झाला आहे.
फेब्रुवारीपासून ५७,४०३ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत म्हणजेच फेब्रुवारी ते १४ मे या कालावधीत ५७,४०३ कोरोनाग्रस्त व या कालावधीत ९१३ संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण या कालावधीत आहे. ऑक्सिजन बेड, रेमडेसिविरसाठी, एवढेच नव्हे तर स्मशानभूमीतही ओट्यासाठी प्रतीक्षेत राहण्याची, भटकंती करण्याची वेळ या काळात ओढवली आहे.
सक्रिय रुग्ण उच्चांकी १०,८९२जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या कालावधित सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदा उच्चांकी १०,८४२ वर पोहोचली आहे. यात २,३१२ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. याशिवाय ग्रामीणमध्ये उच्चांकी ७,८४७ व महापालिका क्षेत्रात ३.०४५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णसंख्या वाढती असल्याने रिकव्हरीचे प्रमाण ८४.९९ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे.