लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज वितरण गतीने होणे आवश्यक आहे. यंदा खरीपासाठी दीड हजार कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते पूर्ण व्हावे, यादृष्टीने वेगाने कर्ज वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी खरीप कर्ज वितरणाचा आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँक व्यवस्थापक एल.के. झा आदी उपस्थित होते.पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ असावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होता कामा नये. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता बाळगून कामे करावी व कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. खरीप हंगामात बियाणे निविष्ठा व इतर कामांसाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज वेळेत मिळणे आवश्यक आहे. पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या शेतकरी बांधवांना संपूर्ण माहिती द्यावी. आवश्यक कागदपत्रांची यादी यापूर्वीच प्रशासनाने दिली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागू नये. शेतकरी बांधवांची अनावश्यकरीत्या अडवणूक केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांना निधींचे वितरण वेळेत करा
विविध योजनांचा निधी बँकाच्या माध्यमातून लाभार्थींपर्यंत पोहचवला जातो. त्याचे वितरण वेळेत झाले पाहिजे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे पैसे बँकेत येतात, पण ते शेतकरी बांधवांना वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. असे यापुढे कधीही घडता कामा नये, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.