लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाला. या ३० दिवसांत उच्चांकी १६,६९४ कोरोनाग्रस्तांची नोंद व दर १.४१ मिनिटाला एक पॉझिटिव्ह निष्पन्न झालेला आहे. याशिवाय या महिनाभरात ४१० रुग्णांचे उपचारादरम्यान मृत्यू म्हणजेच दर दोन तासांत एका बाधिताचा मृत्यू झाल्याने ही बाब जिल्ह्यावासीयांचे हृहयाचे ठोके वाढविणारी आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढायला सुरुवात झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२२० व ९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह व १६४ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर एप्रिल महिन्यात कहरच झाला. तब्बल १६,६९४ कोरोनाग्रस्त व ४१० बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला हादरा बसला आहे. या महिन्यात दरदिवशी सरासरी ५५७ कोरोनाग्रस्त व १४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय या महिन्यात १२,२१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. म्हणजेच दरदिवशी ४०७ व्यक्ती संकेमणमुक्त झाले, हा या चिंतेच्या काळातही दिलासा राहिला आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्यानंतर चार प्रकारांतील प्रत्येकी २५ असे एकूण नमुने जिनोम स्टडीकरिता पाठविण्यात आले होते. त्यात ७६ नमुन्यांमध्ये ‘डबल व्हेरिएंट म्युटंट’ आढळला होता. याची संसर्ग क्षमता अधिक असल्याने जिल्ह्यात ब्लास्ट झाल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. हे एक प्रकारचे मिनी लॉकडाऊन राज्यात पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात लागू झाले असतानाही कोरोनाचा संसर्ग वाढताच राहिला. आता तर पुन्हा महिनाभरासाठी संचारबंदी व जीवनावश्यक शिवाय सर्व दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही संसर्ग कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे.
ॲक्टिव्ह ८,२३३ रुग्णांचा उच्चांक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असल्याने सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या उच्चांकी ८,२३३ वरे पोहोचली आहे. यामध्ये १९१५ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात १,३४३ व जिल्हा ग्रामीणमध्ये ४,९७५ कोरोनाग्रस्त होम आयसोलेशनची सुविधा घेत आहेत. त्यामुळे तूर्तास आरोग्य यंत्रणेवरचा ताण काहीसा कमी झालेला आहे. मात्र, ग्रामीण भागात संसर्ग वाढता असल्याने या रुग्णांवर करडी नजर ठेवणे महत्त्वाचे आहे.
नागपूरसह अन्य जिल्हे व एमपीतील रुग्ण जिल्ह्यात दाखलजिल्हा सीमेलगतच्या नागपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात व मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड अपुरे पडत आहे. याशिवाय रेमेडेसिविरचा तुटवडा आहे. त्यामुळे गंभीर स्वरुपातील तिनशेवर रुग्ण, अमरावतीसह, अचलपूर, वरूड व तिवसा तेथील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचे नातेवाईक येथे दाखल झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचे मानण्यात येत आहे.
जिल्ह्यात बेडसंख्येचा तुटवडाअन्य जिल्हे व मध्यप्रदेशातील रुग्ण दाखल असल्याने जिल्ह्यातील सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरचा तुडवटा आहे. रुग्णाला आणणाऱ्या १०८ रुग्णवाहिका बेड रिक्त आहे का, याची चौकशी करीत शहरातील २९ रुग्णालयांत चकरा मारत असल्याचे विदारक चित्र आहे. संकेतस्थळावर माहितीदेखील नियमित अपडेट केली जात नाही.