अमरावती : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग असून जिल्हास्तरावर आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. या व्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एक कोटीचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारी वैद्यकीय साधनसामग्री साहित्य औषध खरेदी करता येणार आहे. आमदारांनी शिफारस केल्यानंतर जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता द्यावी, अशा सूचना राज्य शासनाने जारी केलेल्या आदेश दिल्या आहेत. राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोरोना उपायोजना नियमाप्रमाणे शासनाकडून काही तातडीचे उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूबाबत जिल्हापातळीवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीला आणखी बळ देण्यासाठी विशेष बाब म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०१९-२० व २०२०-२१ या अंतर्गत नियोजन विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी आमदारांना ५० लाखापर्यंत निधी उपलब्ध करून देण्यास पूर्वी मंजुरी देण्यात आली होती. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाची परिस्थिती अद्यापही आटोक्यात आली नसल्याने जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसोबतच अतिरिक्त बाबी खरेदी करण्यासाठी आमदारांना सन २०२०-२२ या आर्थिक वर्षात जास्तीत जास्त एक कोटी उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा निधी मंजूर करताना शासनाने पन्नास लाखांच्या मर्यादेत आणखी वाढ केल्याने वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यास वाव मिळणार आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ आर्थिक वर्षाकरिता वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी आमदारांना निधीची शिफारस केल्यास जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देणार आहेत. त्यानंतर जिल्हा स्तरावरचे सेवा-सुविधांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी अटी-शर्तींनुसार व यंत्रसामग्री साहित्य औषधे खरेदी करतील. मात्र, आमदार निधीतून वैद्यकीय यंत्रसामग्रीसंदर्भात देखभाल व दुरुस्तीसाठी निधी देता येणार नाही. अशा वैद्यकीय साधन-सुविधांसाठी कोणताही खर्च आमदार निधीतून दिला जाणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
बॉक्स
ही वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करता येणार
आमदार निधीतून वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर, बायपॅप मशीन, हॉस्पिटल बेडस, व्हायटल साईन मॉनिटर्स, एनआयसीयू व्हेंन्टिलेटर, स्ट्रेचर, पेशंट ट्रॉली, इमर्जन्सी ट्रॉली, फार्मास्युटिकल फ्रिज, व्हॅक्सिन बॉक्स, कोरोनाविषाणू प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक औषधे आदी खरेदी करता येणार आहे.