गजानन मोहोड
अमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त तर यंदा भर पावसाळ्यात महिनाभर पावसाचा खंड यामुळे पिकांची दैना झालेली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्याने मात केली. यंदाच्या आठ महिन्यात तब्बल ७३७ शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत. या आठ महिन्यात दर आठ तासात एक शेतकरीमृत्यूचा फास ओढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. त्यातही अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत सर्वाधिक २०६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या जिल्ह्यात दर दिवशी एक शेतकरी आत्महत्या होत आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यात १९४, यवतमाळ १८९, अकोला १०४ व वाशिम जिल्ह्यात ४४ शेतकरी आत्महत्या यंदाच्या आठ महिन्यात झालेल्या आहेत.
विभागात शेतकरी आत्महत्यांचे क्लस्टर शोधून तेथील तणावात असलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येऊन शासन योजनांचा लाभ घेण्याचे सूतोवाच विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी केले होते. प्रत्यक्षात हे अभियान पुढे सरकलेच नाही. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन हा देखील पांढरा हत्ती ठरल्याने शासन-प्रशासनाचे प्रयत्न थिटे पडत असल्याचे दिसून येते.
सन २००१ पासून १९,६०३ शेतकरी आत्महत्या
विभागातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्या प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ५१४८, बुलडाणा ४०६६, यवतमाळ ५५८७, अकोला २८९५ व वाशिम जिल्ह्यात १९०७ अशा एकूण १९,६०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ८४५७ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय १०,१९९ प्रकरणे अपात्र तर २३६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
या कारणांमुळे होत आहेत शेतकरी आत्महत्या
नैसर्गिक आपत्तीने शेती पिकांचे नुकसान, दुष्काळ, नापिकी, बँका व खासगी सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे विभागातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. गरजू शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहेत.