लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : अमरावती-यवतमाळ रोडवरील शिंगणापूर फाट्याच्या चौफुलीवर ट्रक व एसटी अपघातात एक प्रवासी ठार, तर २७ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. पांडुरंग बोडखे (७४, रा. कवठा) यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशिक खडसे (रा. पाथ्रट गोळे), पार्वताबाई पोहनकर (रा. पिंपरी कलंगा), मुमताज बेगम (रा. अमरावती), अरुणाबाई अमुने (रा. पुसद), अनिकेत राठोड (रा. पुसद), कुसुम पोहनकर (रा. शिंगणापूर), प्रियंका दायमा (रा. पुसद), वनिता खडसे (रा. पाथ्रट गोळे), पंडित कंडेल (रा. महागाव), वनिता मेश्राम (रा. मालखेड), प्रेमदास चव्हाण, चेतन छागाणी (रा. दारव्हा), सारिका भिडेकर (रा. बडनेरा), अश्विन जाधव (रा. पुसद), सिद्धार्थ धुळे (रा. पुसद), शालिनी गुजर, बाळकृष्ण काळे (रा. शेंद्री डोलारी), विजय पत्रे (रा. पुसद), तुषार भिडेकर (रा. बडनेरा), नरेश छांगाणी (रा. दारव्हा), वसंत वहाने (रा. दिघी कोल्हे), सुरेखा इंगळे (रा. पुसद), साक्षी उंबरकर (रा. पुसद) अशी जखमींची नावे आहेत. यातील काहींना नांदगाव खंडेश्वर व नेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील १४ प्रवाशांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वाहक प्रेमदास चव्हाण यांच्यासह तिघे गंभीर जखमी असल्याचे सूत्रानी सांगितले. एमएच ४० वाय ५९२६ क्रमांकाची एसटी बस पुसदहून,अमरावतीकडे येत होती, तर एम.एच. १६ एवाय ९७६७ क्रमांकाचा ट्रक औरंगाबादहून नागपूरकडे जात असताना हा अपघात घडला. चौफुलीवरून धिम्या गतीने जाणाऱ्या एसटीला भरधाव ट्रकने सुमारे पन्नास ते साठ फूट फरफटत नेले. या धडकेनंतरही चालकाने एसटीचे संतुलन कायम ठेवत ती रस्त्याच्या खाली सुरक्षित उतरविली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच ठाणेदार हेमंत ठाकरे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. शिवणी, शिंगणापूर व नांदगाव खंडेश्वर येथील बरेच सामाजिक कार्यकर्ते अपघाताची माहिती कळताच अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. अपघात घडवून आणणाऱ्या ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
रुग्णालयात गर्दीजिल्हा सामान्य रुग्णालयात एसटी अपघातातील जखमींना उपचारासाठी दुपारी १ च्या सुमारास आणले गेले. ही वार्ता कळताच त्यांच्या अमरावती येथील आप्तांनीही रुग्णालय गाठले. यामुळे या परिसरात एकच गर्दी होती.
ग्रामस्थ आले मदतीला धावून बुधवारी दुपारी ११ वाजता अपघात घडल्याचे निदर्शनास येताच शिंगणापूर येथील ग्रामस्थ मदतीला धावले. पोलीस येण्यापूर्वी आटोकाट प्रयत्न करीत त्यांनी जखमींना एसटीबाहेर काढले. दरम्यान, काही जखमींना राजापेठ, तर तीन ते चार जणांना काँग्रेसनगर मार्गावरील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. चालक महमूद खान पठाण (५६) हेदेखील गंभीर जखमी झाले. ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा नोंदविण्यात आला.