अमरावती : ‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत शासकीय, जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीमधील शालेय विद्यार्थ्यांना येत्या नवीन शैक्षणिक सत्रापासून शासनाकडून मोफत गणवेशापाठोपाठ बूट आणि दोन मोज्याची जोडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख २० हजार ५४७ विद्यार्थ्यांसाठी सुमारे दोन कोटी ४९ लाख दोन हजार ९९० रुपयांची खरेदी संबंधित शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केली जाणार आहे. यासाठीचा निधी शिक्षण विभागाने १४ पंचायत समितींना वितरित केला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांना मोफत गणवेशासोबतच आता दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देण्यात येणार आहेत. या वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करावयाची असल्याने या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्याला सुमारे दोन कोटी ४९ लाख रुपये, तसेच बूट, पायमोज्याकरिता ८२ कोटी ९२ लाख दोन हजार ९९० रुपये इतका निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. यामधून १४ तालुक्यांतर्गत येणाऱ्या एक हजार ६६८ शाळेतील सुमारे एक लाख २० हजार ५४७ शालेय विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
यंदा शासनाने त्यांना मोफत बूट देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी समग्र शिक्षा अभियानातून जिल्ह्याला दोन कोटी ४९ लाख २ हजार ९९० रुपये मिळाले आहेत. हे पैसे गुरुवार, १३ जून रोजी सीईओ संतोष जोशी यांच्या आदेशाने तालुकास्तरावर वितरित केले आहेत. एसएमसीच्या शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे खरेदी करण्याचे आदेश आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेशासोबत बूट आणि पायमोजेही दिले जाणार आहेत.
असा मिळाला तालुक्यांना निधीअचलपूर २१,७६,६८०,अमरावती १२,७५,१७०,अंजनगाव सुजी ११,८०,४८०,भातकुली ९,१९,३६०, चांदूर बाजार १६,३२,८५०, चांदूर रेल्वे ८,२४,१६०, चिखलदरा १६,८७,४२०, दर्यापूर १२,७६,३६०, धामणगाव रेल्वे ९,४४,६९०, धारणी ३३,७०,९३०, मोर्शी १५,९३,२४०, नांदगाव खंडेश्वर १२,४६,४४०, तिवसा ८,९९,६४०, वरूड १४,६५,५७० असे एकूण २,०४,९२,९९० रुपयांचा निधी वितरित केला आहे.येत्या नवीन शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजे दिले जाणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. याकरिता शिक्षण विभागाने बूट अन् पायमोजे खरेदीसाठी निधी वितरित केला आहे.-बुद्धभूषण सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक