अमरावती : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी राज्यभरातील विविध ६० विभागांच्या कर्मचारी संघटनांनी संप पुकारला. जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्याची माहिती आहे. यात महापालिकेचे ५०० च्या वर अधिकारी कर्मचारी सहभागी झाले.
सन २००५ नंतर महापालिकेच्या सेवेत आलेल्यांसह सर्वच अधिकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले. तर महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व दोन्ही उपायुक्त, शहर अभियंता, मुख्यलेखाधिकारी, मुख्यलेखापरिक्षकांनी प्रशासकीय कामकाजाचे सुकाणू हाती घेतले होते. सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालये कुलूपबंद होती. तर आरोग्य, स्वच्छता व अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी काहीवेळ सेवा दिली.
२००५ पुर्वी महापालिका आस्थापनेत आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुर्णवेळ कामकाज सांभाळले. मात्र काहीवेळ संपात सहभागी होऊन त्यांनी सहकाऱ्यांच्या संपाला सक्रिय पाठिंबा देखील दिला. अनेक विभाग कुलूपबंद असल्याने कंत्राटी कर्मचारी सुध्दा संपात सहभागी झाल्याचे दिसून आले. जुन्या कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन कर्मचाऱ्यांना देखील तीच पेन्शन योजना लागू करावी, यासाठी कर्मचारी आग्रही असून त्यामुळेच हा बेमुदत संपाचा इशारा सर्वच राज्य संघटनांनी दिला आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून त्याचा फटका नागरिकांना बसला आहे.
हे झाले सहभागी
महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर संपकऱ्यांनी एकच मिशन जुनी पेन्शनचे नारे दिले. यावेळी महिला बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सांख्यिकी अधिकारी योगेश पिठे, सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे, विधी अधिकारी श्रीकांत चव्हान, सहायक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे, एमओएच डॉ. विशाल काळे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर या अधिकाऱ्यांसह शिक्षक, लिपिक, सहायक अधीक्षक, स्वास्थ निरिक्षक आदी सहभागी झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले.