अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने 'वोकल फॉर लोकल' व्हिजनला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक/स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ७९ रेल्वे स्थानकावर ६१ प्रकारच्या लोकप्रिय वस्तू, साहित्य विक्री नोंदणीकृत ओएसओपी केंद्रावर होत आहे. लाभार्थ्यांनी आतापर्यंत २.४६ कोटीचे उत्पन्न मिळवले आहे.
केंद्र सरकारच्या 'वोकल फॉर लोकल' व्हिजनला प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक/स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि उत्पन्नाच्या अतिरिक्त संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वेवर 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' (ओएसओपी) योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत समाजातील उपेक्षित घटक, स्वदेशी/स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री आणि उच्च दृश्यमानता देण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ओएसओपी आउटलेट दिले जातात. योजनेची सुरूवात २५ मार्च २०२२ रोजी सुरू झाली आणि २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण राज्यात ७४ रेल्वे स्थानकांवर ७९ ओएसओपी आउटलेट्सने आहेत. हे ओएसओपी स्टॉल्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद यांनी संपूर्ण रेल्वेमध्ये एकरूपतेसाठी डिझाइन केले आहेत.
स्थानिक वस्तू, साहित्य विक्री'वन स्टेशन वन प्रोडक्ट' हे त्या-त्या ठिकाणासाठीचे वैशिष्ट्य आहे आणि त्यात स्थानिक जमातींनी बनवलेल्या कलाकृती, स्थानिक विणकरांच्या हातमाग, जगप्रसिद्ध लाकूड कोरीव काम, चिकनकारी आणि झारी-जरदोजी यांसारख्या हस्तकला, कपड्यांवरचे काम किंवा चहा, कॉफी आणि इतर प्रक्रिया केलेले मसाले यांचा समावेश आहे. अर्ध-प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ/उत्पादने या भागात स्वदेशी उगवले जातात. त्याच वस्तू, साहित्याची विक्री केली जाते.
बडनेरा येथील सांभारवडी, शेगावच्या उदबत्तीची विक्रीराज्यातील रेल्वे स्थानकांवरील ओएसओपी आऊटलेट्सवरील विविध उत्पादनांमध्ये अहमदनगर येथील केळी, द्राक्षे, पापड, लोणचे; बडनेरा येथील सांबरवडी; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे चामड्याची उत्पादने; चिंचवड येथील घरगुती अगरबत्ती, धूप, साबण, फिनाइल; चर्चगेट येथील चामड्याची उत्पादने; गोरेगाव येथील खादी उत्पादने; इगतपुरी येथील हंगामी फळे आणि पपई, द्राक्षे, सफरचंद, लोणचे, पापड यासह हाताने बनवलेली कोल्हापुरी चप्पल; कणकवली व कुडाळ येथे लाकडी खेळणी; लोणावळा येथे चिक्की व फज उत्पादने; नाशिकरोड येथील पैठणी साड्या; पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती, कुमकुम, अगरबत्ती व इतर पुजेचे साहित्य; नागपूर येथील बांबूचे साहित्य; परळ येथील टेक्सटाईल आणि हातमाग; पिंपरी येथे हाताने बनवलेल्या पर्स बॅग (कागद आणि कापडापासून बनवलेल्या); सातारा येथील कंदी पेढा; शेगाव येथील पापड; सोलापूर येथील सोलापुरी चादर, बेडशीट आणि टॉवेल; वापी आणि बोरिवली येथे वारली कला आणि हस्तकला; वसई रोड आणि नालासोपारा येथे सॉफ्ट टॉईज यांचा समावेश आहे.