मोहन राऊत
धामणगाव रेल्वे (अमरावती) : जर तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं, हे शिकवेल, हा भारतरत्नांचा विचार मनात ठेवत तालुक्यातील एका ध्येयवेड्या युवकाने बाबासाहेबांच्या जीवनावरील एक हजार लेखांचे तसेच दोन हजारांहून अधिक दुर्मीळ छायाचित्रांचे संकलन केले आहे.
तालुक्यातील पेठ रघुनाथपूर हे दीड हजार लोकवस्तीचे छोटेसे गाव. यातील दिलीप वसंत महात्मे या युवकाने बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांचे साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली. आज त्याच्याकडे बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ वृत्तपत्रापासून तर प्रसिद्ध पुस्तकातील लेखांचे संकलन आहे. ‘तुझेच चक्र फिरे जगावरी’ असे ७१० पानांचे पुस्तक आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित ३१० लेख यात आहेत. दिलीपकडे २ हजार १०० दुर्मीळ छायाचित्रे आहेत. शंभरपेक्षा जास्त कविता त्याच्याकडे संकलित आहेत.
बाराव्या वर्षी जोपासला छंद
दिलीप महात्मे यांनी सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध यांचे विचार व जीवनपट आधारित माहिती संकलित केली. त्यानंतर विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, जीवनपट, कविता व छायाचित्रांचे संकलन केले. यासोबतच वयाच्या बाराव्या वर्षांपासून दिलीप महात्मे यांनी विविध विषयांवरील २९ विशाल खंड संकलित केले आहेत. जगातील सर्व देशातील नाणी दिलीप महात्मे यांच्याकडे पाहायला मिळतात.