शालेय पोषण आहार योजना : पालकांना आर्थिक भुर्दंड
अमरावती : शालेय पोषण आहार योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यंदाच्या उन्हाळी सुटीतील पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. मात्र, ही रक्कम कमी अन् त्यासाठी खाते काढण्याचा खर्चच अधिक आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शासन निर्देशानुसार केवळ उन्हाळी सुटीतील पोषण आहारासाठी ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दरदिवशी प्रतिविद्यार्थी ४.४८ रुपये दिले जातात. सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना दररोज ६.७१ रुपये दिले जातात. दोन महिन्यातील कामकाजाचे दिवस लक्षात घेतल्यास पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये ८० पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २४४ रुपये ८५ पैसे मिळणार आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. एवढ्या कमी रकमेसाठी पालकांना विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडावे लागणार आहे. बँकेत खाते काढण्यासाठी साधारणपणे एक हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याशिवाय बँक खाते उघडण्यासाठी ग्रामीण भागातील पालकांना हातातील कामे सोडून जावे लागत आहे. तेथे बँकेत एकदा जाऊन कामे होत नसल्याने पालकांना वारंवार मजुरी पाडून हे काम करावे लागणार आहे. याआधी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी अल्पसंख्याक सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीसाठी बँक खाते काढण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अनेक पालकांनी अशी खाती काढली नाही. ज्यांनी काढली, त्यांच्या खात्यावर व्यवहार झाले नाहीत. खात्यात किमान शिल्लक नसल्याने अनेक खाती बंद पडली आहेत. काहींना दंडही ठोठावला गेला आहे. शिक्षकांनी ही खाती उघडून घेतल्यानंतर दंड पडल्याने त्यांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
बॉक्स
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?
पहिली - ३८७१५
दुसरी - ४०२७०
तिसरी - ४३८०१
चौथी - ४५२०३
पाचवी - ४४०३३
सहावी - ४४७२७
सातवी - ४४३१८
आठवी - ४४७४३
बॉक़्स
पालकांची डोकेदुखी
कोट
शालेय पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी त्यांचे बँक खाते काढावे लागणार आहे. याकरिता गोरगरीब पालकांना पैस खर्च करावा लागेल. ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.
- चंद्रशेखर मेहरे, पालक
कोट
मुलांना पोषण आहाराऐवजी रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या आमच्यासारख्या पालकांना दोनशे रुपयांसाठी हजार रुपये खर्च करणे कठीण आहे. त्यामुळे पोषण आहार दिला, तर बरे होईल.
- अजय बोबडे, पालक
बॉक्स
लाभापेक्षा भुर्दंड अधिक
पाेषण आहाराऐवजी आता विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये ८० पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २४४ रुपये ८५ पैसे मिळणार आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र, यासाठी काढावे लागणाऱ्या बॅक खात्यासाठी लाभापेक्षा आर्थिक भुर्दंड अधिक आहे.
कोट
शासनाने पोषण आहाराऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांना सूचना दिल्या आहेत. याही पुढे वरिष्ठस्तरावरून प्राप्त होणाऱ्या सूचनेप्रमाणे कारवाई केली जाईल.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)