उत्पादक हवालदिल : कांद्याचा झाला वांदालोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तालुक्यात दरवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या पेरणीत वाढ झाली आहे. मात्र भाव पडल्याने कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केला आहे. पेरणी खर्च निघणे कठीण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी तालुक्यात ५५० हेक्टर क्षेत्रात कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र यंदा ही लागवड २५ टक्के वाढून ६७५ हेक्टरपर्यंत पोहोचली. कांदा लागवडीकरिता मोठ्या प्रमाणात खर्च लागत असून बियाणे खरेदी, मशागत, रासायनिक खते, निंदन आदींचा खर्च लागतो. या खर्चाच्या बदल्यात शेतकऱ्यांना एकरी ७० ते ८० क्विंटल कांदा पिकतो. यंदा मात्र कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांनी ९० दिवसापर्यंत आपल्या शेतात पिकविलेला कांदा बाजारात २५० ते ३०० रूपये क्विंटल प्रमाणेच खरेदी होत आहे. कांदा हे पीक जास्त काळ ठेवता येत नसून इतक्या मोठ्या प्रमाणात पिकणाऱ्या पिकाला ठेवण्याकरिता शेतकऱ्यांजवळ कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची वाढ न बघता मिळेल त्या भावात कांदा विकावा लागत आहे. कांदा पीक वातावरण व परिस्थिती बघता पेरणीयोग्य आहे. मात्र पिकाचे भाव पडल्याने हे पीक नुकसानदायक ठरत आहे. पिकाच्या लागवडीचा खर्चही निघत नसून ७५ टक्के खर्च वाढीव झाला आहे.- अनिल खुळे, शेतकरीहोलसेल दरात कांदा २०० प्रतिक्विंटल मिळत असून चिल्लर विक्री ५ रुपये किलोप्रमाणे सुरू आहे. यावर्षी कांदा पीक भरपूर असल्याने तुलनेत उठाव कमी आहे.- शंकरराव सोनकर, व्यापारी
कांदा २०० रुपये क्विंटल
By admin | Published: May 30, 2017 12:16 AM