अमरावती : सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार मंगळवार १५ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर आवेदनपत्र भरता येणार आहेत.
शिक्षण विभागाच्यावतीने अमरावतीसह अन्य विभागीय मंडळाच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे सन २०२१ या परीक्षांना विलंब होणार असला तरी शिक्षण मंडळांच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नियमित पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचे अर्ज भरता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला वाणिज्य विज्ञान शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी १५ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत संधी देण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेची नियमित पूर्ण परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी श्रेणी सुधार योजने अंतर्गत व विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना ५ ते १८ जानेवारी २०२१ या कालावधीत आवेदन पत्र प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन सादर करता येणार आहेत. संबंधित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना चलन डाऊनलोड करून बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी १५ डिसेंबर ते २५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान बारावीच्या ऑनलाईन अर्जाच्या प्रक्रियेची घोषणा झाली असून, लवकरच दहावीसाठीची प्रक्रिया प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बॉक्स
खासगी विद्यार्थ्यांना स्वतंत्र कालावधी
सन २०२१ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नव्याने फ्रॉम क्रमांक १७ व्दारे प्रविष्ट होणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांचा आवेदन पत्र भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे संबंधित खासगी विद्यार्थ्यांनी आता आवेदनपत्रे सादर करू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.