अमरावती : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात येणार्या सर्व स्पर्धांसाठी यापुढे शाळांना ऑनलाईन अर्ज भरणे सक्तीचे केले असून त्याबाबत शाळांच्या क्रीडा शिक्षकांना एक जूनपासून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थी खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने घेतल्याने खेळाडूंची नोंदणी करणे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुलभ होणार आहे. या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकार्यांमार्फत कार्यशाळा घेतल्या जाणार आहे. शाळांच्या क्रीडा शिक्षकांना हाताने अर्ज भरून ते जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे स्वत: घेवून यावे लागत असल्याचे शिक्षक व प्रशासकीय यंत्रणा दोघांचा वेळ जात होता तो टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. या योजनेमुळे शाळेतल्या प्रत्येक खेळाडूला एक युनिक आयडी देण्यात येणार आहे. त्यामुळे रेकॉर्ड ठेवणे सोयीस्कर होणार आहे. राज्य शासनाने सक्ती केल्यानंतर याची अंमलबजावणी करताना या कार्यालयाने खेळाडूची माहिती संकलीत केली आहे. येत्या काही दिवसातच सुरू होणार्या कार्यशाळेत शालेय, महिला व ग्रामीण क्रीडा स्पर्धेचा प्रवेश अर्ज ऑनलाईन कसा भरावा या जिल्हा व शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नोंदणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी खेळाडूंची नोंदणी कशी करावी क्रीडा विभागाच्या वेबसाईटवर प्रत्येक खेळाडूचा तपशील देऊन प्रत्येकास नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे. या क्रमांकाचा वापर करूनच आगामी वर्षात स्पर्धेत प्रवेश घेता येणार आहे. या प्रवेश प्रणाली व त्याबाबतची आवश्यक माहिती कार्यशाळेत दिली जाईल. शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाईन अर्ज
By admin | Published: May 27, 2014 12:24 AM