मोबाईल, टॅब, इंटरनेटची भर, २० ते २५ हजारांची करावी लागली अवेळी तरतूद
अमरावती : कोरोनाकाळात शैक्षणिक बाबीत पूर्णत: बदल झाला आहे. शालेय शिक्षणाने मोबाईल आणि संगणकीय शिक्षणावर भर दिला आहे. त्यामुळे पालकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. नवनवीन शैक्षणिक ॲप संचालित करणारे मोबाईल, टॅब, संगणक खरेदीसाठी २० ते २५ हजारांची अवेळी तरतूद केल्यानंतर आता रिचार्जचा खर्च दरमहा खिशाला लागलाच आहे.
अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना जोरात वाढला. पहिल्या लाटेत अमरावती बरीच दिवस ग्रीन झोनमध्ये राहिले. परंतु, दुसऱ्या लाटेत हजारो बाधितांबरोबर शेकडोंना जीव गमवावा लागला. आजपर्यंत १,५५५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनामुळे दीड वर्षांपासून सर्वाधिक फटका बसला तो शिक्षणक्षेत्रालाच. ऑनलाईन शिक्षण हे केवळ नावापुरतेच राहिले आहे. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना नेमके काय सुरू आहे, हे कळू शकत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिक्षणपद्धत बदलून गेली आहे. कला शाखा तसेच मराठी माध्यमांचा कधी तरी संगणकाशी येणारा संबंध आता दररोज येऊ लागला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल खरेदी करून देताना पालकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे.
------------------
जिल्ह्यात वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली : ४०,६३५
दुसरी : ४१,७४५
तिसरी :४४,१०१
चौथी :४३,८४७
पाचवी : ४४,७२१
सहावी : ४४,०५४
सातवी : ४४,४२०
आठवी : ४४,५१६
नववी : ४४,८४४
दहावी : ४५,४६८
----------------------
महिन्याकाठी हजार ते दीड हजारांचा खर्च
- शाळांकडून नियमित वर्ग घेतले जात असल्याने पालकांकडे मोबाईल, संगणक, टॅबची मागणी पाल्यांची होऊ लागली आहे. अभ्यासाचे कारण असल्याने पालकांनी हे साहित्य खरेदी करून देण्याबरोबर इंटरनेटची सेवाही उपलब्ध करून द्यावी लागत आहे.
- पालकांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे. घरातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे स्वत:चे साधन हवे. त्यामुळे काही पालकांचा खर्च ५० ते ६० हजारांंवर गेला आहे, तर महिन्याकाठी हजार ते दीड हजार रुपये इंटरनेटचे बिल भरावे लागत आहे.
-----------
कोट
ऑनलाईन वर्ग असले तरी शैक्षणिक शुल्क भरावे लागतेच. आता इंटरनेटचा खर्च वाढला असून, मोबाईल, लॅपटॉप, संगणक काही तरी नवे हवे, असा पाल्यांचा अट्टहास असतो. पालक म्हणून सुविधा कमी पडणार नाही, याची काळजी पालक घेतात. त्यामुळे पालकांना साहित्य खरेदी करून द्यावे लागते.
- पंकज मेश्राम, पालक.
-------------
कोट
शाळांपेक्षा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची नवीन साधनांची गरज भासू लागली आहे. काळानुसार मागणीतही बदल होत आहे. जसे हेडफोन, ब्ल्यू टूथ हवे. कानाला त्रास होणार नाही. अशा गुणवत्तेचे मोबाईलसुद्धा फोरजी,फाईव्हजी क्षमतेचा हवा. पाल्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अभ्यासाच्या कारणांनी त्या पूर्ण कराव्या लागतात.
- शुभांगी देशमुख, पालक.
---------
मुलांचे शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक नुकसान
मोबाईलच्या वापरामुळे मुलांचे शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक नुकसान हाेत आहे. शाळा बंद असल्याने मैदानी खेळाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. मोबाईल वापराने घरातील संवाद खुंटला आहे. यात यू-ट्युबच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे मुलांची चीडचीड वाढली आहे. अशावेळी पालकांनी मुलांशी संवाद वाढवून आराेग्याची काळजी घेतली पाहिजे.
- आशिष साबू, मानसोपचारतज्ज्ञ