लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२० ऑनलाईन परीक्षा ५ मेपासून प्रारंभ होत आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. मोबाईल, डेस्कटॉप, लॅपटॉपद्वारे ऑनलाइन परीक्षा देता येईल. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन परीक्षांच्या अनुषंगाने सुविधा नाही, अशांना महाविद्यालयांनी व्यवस्था करून द्यावी लागणार आहे.ऑनलाइन परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलींच्या आधारे (एमसीक्यू) होत आहे. ५ मे ते ६ जून दरम्यान परीक्षा होणार असून, ६०० अभ्यासक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळे गुण दिले जातील. ८० गुणांच्या विषयासाठी प्रश्नपत्रिकेतील ४० पैकी ३० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. विषयांचे गुण, प्रश्नपत्रिकेतील गुण आणि परीक्षार्थींनी सोडविलेल्या प्रश्नानुसार गुणांकन होणार आहे. परीक्षा महाविद्यालयात तर गुण विद्यापीठ देणार, असे या परीक्षांचे वैशिष्ट्य असणार आहे.
विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांसाठी बाह्य यंत्रणा नियुक्त केली नाही. मू्ल्यांकन स्वयंचलित ठेवण्यात आले आहे. अचूक प्रश्न सोडविले, तरच गुण मिळतील. महाविद्यालयांना प्रतिविद्यार्थी १० रुपये दिले जातील.- हेमंत देशमुख संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग
एकाच वेळी सुरू होणार परीक्षाविद्यापीठ अंतर्गत सर्वच महाविद्यालयांत एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा सुरू होेतील, अशी तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयाला स्वतंत्र पासवर्ड देण्यात आला आहे. ६०० अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अचूक नियोजन करण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका महाविद्यालयात पाठविण्यात आल्या आहेत.
स्वयंचलित मूल्यांकनऑनलाईन परीक्षांची व्यवस्था करताना विद्यापीठाने स्वयंचलित मूल्यांकन होईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रश्नांची उत्तरे ओके केली की, ते उत्तर डेटा बेसच्या ऑप्शनमध्ये असल्यास स्वयंचलित गुण देण्याची प्रणाली विकसित केली. त्यामुळे नव्याने मूल्यांकन करण्याची गरज असणार नाही, अशी अद्ययावत व्यवस्था विद्यापीठाने तयार केली.
परीक्षेच्या कालावधीत उघडणार लिंकऑनलाइन परीक्षांचे वेळापत्रक विद्यार्थी, महाविद्यालयांना देण्यात आले आहे. त्यानुसार परीक्षा असलेल्या वेळेतच लिंक ओपन होईल, अन्यथा दुसऱ्या वेळेत लिंक उघडणार नाही, अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. हिवाळी २०२० नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा दरदिवशी तीन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.