अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., शाखांचे ऑनलाईन परीक्षा सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ (बीओयू)च्या बैठकीत घेतला. याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून केली जाईल, अशी तयारी परीक्षा व मूल्यांकन विभागाने चालविली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बीओयूच्या बैठकीत प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, दिनेश निचत, मनीषा काळे आदी उपस्थित होते. यावेळी परीक्षा विभागाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याविषयी चर्चा करण्यात आली.दरम्यान बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., शाखांचे ऑनलाईन परीक्षा आवेदन पत्र सुरू करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. यापूर्वीच्या परीक्षा आवेदन पत्रात असलेल्या आई-वडिलांचे उत्पन्न, शिक्षणाची अट काढण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी हिवाळी परीक्षेपासून केली जाणार आहे. नामांकन, बॅकलॉग, सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन परीक्षा फार्म भरावा लागणार आहे. दरवर्षी ५० हजारापेक्षा जास्त विद्यार्थी या तीनही शाखांना प्रवेशित होत असतात. यापूर्वी ऑफलाईन परीक्षा फॉर्ममुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात यावे लागत होते. मात्र आता विद्यार्थ्यांचा त्रास वाचणार असून, विद्यापीठाकडेसुद्धा निर्धारित वेळेत परीक्षा आवेदनपत्र ऑनलाईन पोहचतील. दरवर्षी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., शाखांचे सुमारे ४ लाखांच्या घरात विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात.ऑनलाईन परीक्षा फार्मसाठी समितीबी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., शाखांचे ऑनलाईन परीक्षा अर्जाचे स्वरूप कसे राहील, याविषयी समिती गठित करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष मनीषा काळे, तर सदस्य म्हणून प्राचार्य ए.बी. मराठे, विद्यापीठाचे गणित विभागप्रमुख डॉ. कतोरे हे राहतील.ऑफलाईन परीक्षा आवेदन पत्रामुळे नियोजन कोलमडत आहे. बरेचदा वेळेवर परीक्षार्थी फार्म भरतात. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक तयार करताना कसरत होते. मात्र आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा फार्म भरावा लागणार असल्याने वेळ, तारीख निश्चित होणार आहे. परीक्षा आणि निकाल जाहीर करण्यास अवधी मिळेल.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ,अमरावती विद्यापीठ
बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.चे ऑनलाईन परीक्षा फॉर्म, येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 8:04 PM