अमरावती : स्थानिक हमालपुरा येथे विनापरवाना सुरू असलेल्या एका ऑनलाइन गेम सेंटरवर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत २१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ७ नोव्हेंबर सायंकाळी टाकलेल्या या धाडीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हमालपुरा येथे विनापरवाना व अवैधरीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन गेम सेंटरमध्ये काही जण लोकांकडून पैसे घेऊन हार-जीतचा खेळ खेळत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या राजापेठ पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी त्या गेम सेंटरवर धाड टाकली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांची चौकशी केल्यावर त्यांनी आपली नावे ओम राजेंद्र पराळे (३८, रा. यवतमाळ), विक्की राजू चवरे (३०, रा. हरिदास पेठ, बडनेरा) व ऐफाज अली वल्द हैदर अली (२८, रा. ताजनगर, अमरावती) अशी सांगितली. त्यांना गेम सेंटरच्या मालकाबाबत विचारणा केली असता त्यांनी सेंटरचा मालक आकाश बबनराव पाटील (रा. पार्वतीनगर क्रमांक ३, अमरावती) हा असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावर त्याने आपल्याजवळ कोणतीही शासकीय परवानगी नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तेथील २१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, डीबी प्रमुख अंमलदार मनीष करपे, पंकज खटे, रवी लिखितकर, गनराज राऊत, सागर भजगवरे यांनी केली.