अमरावती : हिंदू जनजागृती समितीतर्फे १३ एप्रिल रोजी हिंदूंचा नववर्ष दिन अर्थात गुढीपाडव्यानिमित्त आदर्श रामराज्य पाहण्यासाठी हिंदू राष्ट्राची संकल्पना' या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन रविवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले होते.
नागपूरचे हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक विद्याधर जोशी यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना, हिंदू राष्ट्र स्थापनेची आवश्यकता व त्यासाठी हिंदू धर्म व राष्ट्रप्रेमींनी करावयाचे प्रयत्न यावर प्रभावीपणे मार्गदर्शन केले. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना आतंकवादी ठरविण्यात येत आहे, तर शिवाजी महाराजांचा इतिहास काही ओळीतच सांगितले जात आहे. देशात १५-२० लाख लोकांचे दरवर्षी धर्मांतरण होत आहे. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणासाठी अर्थसंकल्पात ५ हजार २९ कोटींची तरतूद केली जाते. भारतीय राज्यघटनेत हिंदूंना धर्म शिकवण्यास प्रतिबंध आहे, तर अल्पसंख्याकांना धार्मिक शिक्षणासाठी अनुदान मिळते. परंतु ५-७ वर्षांतील बदल पाहता देशाची हिंदू राष्ट्राच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. व्याख्यानात हिंदू जनजागृती समितीचे अमरावतीचे समन्वयक नीलेश टवलारे यांनी गुढीपाडव्यालाच नवीन वर्षाची सुरुवात का?, गुढी उभारण्याचे आध्यात्मिक महत्त्व, गुढी उभारण्याचा विधी व छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन व गुढीपाडवा याविषयी होणारा अपप्रचार याचे खंडन करून धार्मिक व राष्ट्रीय विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी नीलेश टवलारे यांनी गुडीपाडव्याला भूमी नांगरली, तर प्रजापती लहरींचा संस्कार झाल्यामुळे भूमीची अंकुरण्याची क्षमता वाढते, अशी महत्त्वपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून करण्यात आली.