अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने १५ ते २० एप्रिलदरम्यान घेण्याबाबतचे निर्देश महाविद्यालयांना दिले आहेत. मात्र, कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊन जाहीर झाले असताना आता प्रात्यक्षिक परीक्षा नको, अशी भूमिका बहुतांश महाविद्यालयांनी घेतली आहे. यात काही प्राचार्य, प्राध्यापकांचीही नकारघंटा आहे.
विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी १४ एप्रिल रोजी पत्र जारी करून हिवाळी २०२० परीक्षांचे प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २० एप्रिल यादरम्यान ऑनलाईन, ऑफलाईन घेण्याबाबत कळविले आहे. मात्र, राज्य शासनाने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता संचारबंदी लागू केली. त्यामुळे आपसुकच महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद असतील, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, विद्यापीठाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या १३ एप्रिल रोजीच्या पत्राचा आधार घेतला आहे. १५ ते २० एप्रिल दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयात घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले. या प्रात्यक्षिक परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घ्याव्या लागणार आहेत. परंतु, लॉकडाऊन आणि कोरोनाचे संकट उभे असताना महाविद्यालयात प्रात्यक्षिक परीक्षांसाठी विद्यार्थ्याना कसे बोलवावे, असा सवाल प्राचार्य, विषय प्राध्यापकांनी उपस्थित केला आहे.
---------------------
महाविद्यालयांना १५ ते २० एप्रिल यादरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा शक्य असल्यास घ्याव्यात, असे पत्राद्धारे कळविले आहे. ही परीक्षा तूर्त घेता आली नाही तर पुढे प्रात्यक्षिक परीक्षा घेता येणार आहे. एमसीक्यू पद्धतीने २५ प्रश्न सोडवावे लागणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ
--------