अमरावती : महानगरपालिका हद्दीत ८६० घरकुलांचा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. यातील ६० लाभार्थ्यांना मंगळवारी म्हसला येथील भूखंडावरील सदनिकेचा ताबा देण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार व पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका वितरण सोहळा महापालिकेतील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. ला 'सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे' संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न पूर्ण व्हावे. या संकल्पनेतूनच म्हसला येथील घरकुलांचे वितरण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या योजनेंतर्गत म्हसला येथे चार मजली इमारतीत ६० सदनिका बांधण्यात आल्या असून, प्रत्येक सदनिकांचे चटई क्षेत्रफळ ३२३ चौरस फूट असून सर्व सुविधांसह (विद्युत, २४ तास पाणी, वाहन पार्किंग) लाभार्थ्यांना विक्री किंमत ९.४८ लाखांत २.५० लाख रुपये अनुदान वगळता लाभार्थी हिस्सा निव्वळ ६.९८ लाख भरावयाचा आहे. योजनेच्या घटक ४ मध्ये (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) अंतर्गत ३६८ कोटींमधून ६,९१३ घरकुलांची कामे प्रगतीत असल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. ऑनलाईन कार्यक्रमात ना. यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, महापौर चेतन गावंडे, सभागृह नेता तुषार भारतीय आदींनी लाभार्थ्यांना गुढीपाडवा तसेच नवीन गृहप्रवेशाच्या शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.