अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ४८ शिक्षकांनी ऑनलाईन प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. यामध्ये १४ पंचायत समित्यांमधील प्रस्तावांचा समावेश आहे.
प्राप्त प्रस्तावांची छाननी, निवड समितीसमोर मांडणी, प्रत्यक्ष मुलाखती व कागदपत्रांची तपासणी, गुणदानानुसार १४ प्राथमिक व एक माध्यमिक शिक्षकाची निवड यादी तयार केली जाणार आहे. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या स्वाक्षरीने संपूर्ण प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मंजुरीला सादर केले जातील. आयुक्त कार्यालयात या संपूर्ण प्रस्तावाची ऑनलाईन व ऑफलाईन तपासणी करण्यात येते. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीने याला मंजुरी देण्यात येते. त्यानंतर जिल्हा परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या सर्व प्रक्रियेचा प्रवास पाहता, ५ सप्टेंबरला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण होणे कठीण आहे.
बाॅक्स
गतवर्षी पुरस्कार वितरित करा
गतवर्षाच्या जिल्हा पुरस्कार वितरणाला जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अद्याप मुहूर्त मिळाला नाही. गतवर्षाला १५ शिक्षकांची निवड झाली,परंतु शिक्षक पुरस्कारापासून वंचित आहे. गतवर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा ५ सप्टेंबरला घेण्यात यावा, अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटना यांनी केली आहे.