अमरावती : जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटाच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी व त्याकरिता केंद्र मिळविणे कमालीच्या अडचणीचे ठरले आहे. सकाळी सात वाजता सुरू होणारी ऑनलाईन नोंदणी अवघ्या पाच मिनिटांत हाऊसफुल्ल होत असल्याने तो ‘फाटेस्ट फिंगर’चा खेळ ठरला. या सर्व प्रकारात दहा दिवसांत फक्त २,७२१ युवकांनाचेच लसीकरण झाल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. या वयोगटात कोविन पोर्टल किंवा ॲपवरून प्रथम नोंदणी करणे अनिवार्य आहे. मात्र, नोंदणीची नेमकी वेळ कोणती असेल, यासाठी अगोदर माहिती दिली जात नाही. शक्यतो सकाळी सात, नऊ किंवा ......... वाजता नोंदणीला सुरुवात होते व अगदी दोन मिनिटांत संबंधित केंद्रावरील नोंदणी पूर्ण झाल्याचे संकेत स्थळावर दर्शविले जाते. या वयोगटात लसीकरणासाठी एक तर केंद्रेच कमी आहेत. त्यात लसींचा तुटवडा आहे. लसीकरणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचीही तयारी दिसून येत आहे. अनेकदा ही लिंकच उघडत नाही. परिणामी १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण सध्या तरी कसरत ठरली आहे.
बॉक्स
क्लिक करण्यापूर्वीच केंद्रे बूक
लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप उघडून केंद्रावर क्लिक करण्यापूर्वी लसी बूक होत असल्याने हा प्रकार नेमका काय आहे, हे युवकांना समजेनासे झाले आहे. याबाबत महापालिका प्रशासन शासनाकडे अंगुलीनिर्देश करीत आहे. आता दोन दिवसांपासून चार अंकी सिक्युरिटी कोड सुरू झाला. त्याचा पर्याय निवडेपर्यंत दिवसाचे बूकिंग झालेले असते.
कोट
केंद्र फुल्ल दाखविण्याच्या प्रकारामुळे आता कंटाळा आला आहे. एक आठवड्यापासून प्रयत्न करीत आहे. सातत्याने प्रयत्न करीत असतानाही केंद्र मिळालेले नाही.
- प्रसाद काळे
ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत केंद्रच मिळत नाही. काही सेंकदांत सर्व केंद्रे फुल्ल दाखवितात. त्यात ही साईट केव्हा सुरू होणार, याविषयी माहिती दिलेली नाही.
- अंकुश बोंडे
आठ दिवसांतही केंद्र मिळालेले नाही. महापालिका व जिल्हा प्रशासन याविषयी काहीही बोलावयास तयार नाही. त्यामुळे मनस्ताप वाढला आहे.
- आशिष मानकर
आमच्या भागातील एकाही तरुणाला केंद्र मिळाले नाही. मात्र, केंद्रावर अमरावतीचे नागरिक लसीकरण करून गेले आहेत. त्यामुळे ऑफलाईन नोंदणी करावी.
शुभम देशमुख