अमरावती : ‘ऑनलाइन टास्क’पुर्ण करण्याच्या मोबदल्यात बक्कळ कमिशनचे आमिष दाखवून येथील एका तरूणाची सुमारे १० लाख २४ हजार ५५९ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. १३ एप्रिल ते १ जूनदरम्यान ती मालिका चालली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरूणाने २८ सप्टेंबर रोजी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, १३ एप्रिल रोजी दहिसाथ येथे राहणारा अजिंक्य जाऊरकर (३०) हा घरी हजर असतांना अज्ञात टेलिग्राम अकाउंट धारकाने ‘वर्क फ्रॉम होम’ करून त्याला नफा मिळविण्याचे आमिष दाखवले. ट्रिवागो नावाच्या हॉटेल कम्पॅरिजन प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी टास्क पुर्ण करण्यास सांगितले. त्यापोटी काही रक्कम देखील त्याच्या खात्यात जमा झाली. त्यानंतर विश्वास संपादन करून पुन्हा वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून तब्बल १० लाख २४ हजार ५५९ रुपये उकळले.
ती रक्कम आरोपींच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर करण्यास त्याला भाग पाडले. अखेर त्याने त्या प्लॅटफॉर्मवर जाणे बंद केले. तथा गुरूवारी सायबर पोलीस ठाणे गाठले. त्याच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञातांविरूध्द फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.