अमरावती: मी तुम्हाला आज जवळून बघितले, तुम्ही खुप सुंदर आहात, छान वाटले. तुम्ही घराचे दार खिडक्या लावत जा, असे व्हॉट्सॲप मेसेज टाकत एका डॉक्टर महिलेचा ऑनलाईन पाठलाग करण्यात आला. ३ ते ८ जानेवारीदरम्यान ही घटना घडली. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी ९ जानेवारी रोजी पrडित महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात व्हॉट्सॲप युजरविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, एक डॉक्टर महिला ३ जानेवारी रोजी सकाळी मेडिकल कॉलेजला पोहोचली तेव्हा तिला तिच्या व्हॉटसॲपवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून हाय असा मेसेज दिसला. नंबर ओळखीचा नसल्याने त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. पुन्हा त्याच मोबाईल क्रमांकावरून नो रिप्लाय? असा मेसेज आला. म्हणून त्यांनी त्या क्रमांकावर हॅलो तुम्ही मला ओळखता का, असा मेसेज केला. डॉक्टर महिलेने त्याला नाव विचारले. मात्र त्याने सांगितले नाही. त्यामुळे त्यांनी रिप्लाय देणे बंद केले. तरीदेखील त्या क्रमांकावरून त्यांना वारंवार व्हॉटसॲप मेसेज आलेत. तुम्ही डोळयाच्या डॉक्टर आहात, मला माहीत पडले, असा मेसेज देखील केला. त्यानंतर ५ जानेवारी रोजी डॉक्टर महिला बाहेरगाावी गेल्या असता गावाला गेलात का, असे मेसेज त्यांना त्याच क्रमांकाहून आलेत. दरम्यान ८ जानेवारी रोजी सायंकाळी त्या घरी असतांना पुन्हा त्याच मोबाईल क्रमांकावरुन त्यांना व्हॉट्सॲप मेसेज आले. त्यात मी तुम्हाला आज जवळून बघितले, तुम्ही सुंदर आहात छान वाटले. तुम्ही घराचे दरवाजे खिडक्या लावत जा, असे मेसेज होते. त्याने ते नंतर डिलिट देखील केले. मात्र त्यांनी ते बघितले होते. अज्ञात व्हॉट्सॲपधारक थांबायचे नावच घेत नसल्याने अखेर त्यांनी ९ जानेवारी रोजी पोलीस ठाणे गाठले. अज्ञात मोबाईल युजरने आपला ऑनलाईन छुपा पाठलाग चालविल्याचे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.