सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे, एका शाळेत पाच वर्षे वयाची अट
अमरावती : गतवर्षी कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना ग्रामविकास विभागाने हिरवी झेंडी दिली आहे. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. एकूण शिक्षकांच्या १० टक्के बदल्या करण्यात येणार असल्याने जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या जवळपास ५०० शिक्षक यंदा स्थानांतरित होणार आहेत. वर्षानुवर्षे अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या शिक्षकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
शिक्षकांच्या दरवर्षीच बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. यंदा मे महिन्यातच या बदल्या करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आली. या बदल्या पारदर्शी व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर ऑनलाइन प्रक्रिया केली जात असली तरी गाव, तालुका, जिल्हापातळीवर शिक्षकांची मंजूर पदे व रिक्त पदांचा मेळ घालूनच त्या करण्यात येणार आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शाळा कधी सुरू होतील, याविषयी अनिश्चितता असली तरी शिक्षकाविना एकही शाळा राहणार नाही व प्रक्रिया वेळेत व्हावी, अशाही सूचना आहेत.
बॉक्स
दिव्यांग, आजारी, विधवांना प्राधान्य
शासनाच्या बदल्यांच्या धोरणात दिव्यांग, गंभीर आजारी, विधवा, परित्यक्ता, हृदयरोगी, कॅन्सर, किडनीच्या आजाराने ग्रस्त शिक्षकांना या बदल्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अशा शिक्षकांना आपल्या आजाराविषयी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
बॉक्स
बदलीस पात्र शिक्षकांचे निकष निश्चित
शिक्षकांच्या बदल्या करताना त्यासाठी शासनाने निकष ठरवून दिले आहेत. एका ठिकाणी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार असून, त्यातही त्या-त्या शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाणार आहे, जेणेकरून साेईच्या ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांना अन्यत्र नेमणूक दिली जाणार आहे.
बॉक्स
आंतरजिल्हा बदलीसाठी पर्याय
अन्य जिल्ह्यात बदली करून जाणाऱ्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी चार जिल्ह्यांचा पर्याय सुचवावा लागणार आहे. त्यातही त्यांनी प्राधान्यक्रम देणे क्रमप्राप्त आहे. त्या-त्या जिल्ह्यातील रिक्त पदे व तिथून बदलून येण्यास इच्छुक शिक्षकांच्या संख्येत या बदल्या केल्या जातील.
कोट
शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या बदली धोरणानुसार अजूनही काही शुद्धीपत्रकांची आवश्यकता आहे. बदली प्रक्रिया असंभव वाटते. शासननिर्णयानुसार सर्वप्रथम अवघड क्षेत्र घोषित होणे आवश्यक आहे. त्याशिवाय बदलीस पात्र शिक्षकांची संख्या निश्चित होणे कठीण आहे. त्यामुळे संघटनेने दिलेल्या सूचनाप्रमाणे शुद्धीपत्रक तातडीने काढणे गरजेचे आहे. बदली प्रक्रियेत राज्यस्तरावर नोडल अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांची नेमणूक होणे आवश्यक आहे. परंतु, त्या दृष्टीने अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही.
- किरण पाटील, राज्य उपाध्यक्ष, अ.भा. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ