अमरावती : ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य सरकारकडून आलेला निधी व झालेला खर्च याची माहिती ग्रामस्वराजमध्ये भरणे बंधनकारक आहे. यामुळे कोणत्याही नागरिकास आपल्या ग्रामपंचायतीने कोणत्या कामावर किती खर्च केला, याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत केवळ ४४ ग्रामपंचायतींचे वार्षिक कॅशबूक ऑनलाईन झाले आहेत, तर उर्वरित ग्रामपंचायतींची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने थेट ग्रामपंचायतींना निधी दिला जातो. हा निधी योग्य पद्धतीने व पूर्ण क्षमतेने खर्च व्हावा, यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या योजनातून प्राप्त झालेला निधी आणि खर्चाच्या रकमेची माहिती ई-ग्रामस्वराज या संकेत स्थळावर ऑनलाइन करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपली माहिती मुदतीत संकेत स्थळावर ऑनलाइन करता यावी, यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये ३० एप्रिलपर्यंत हा उपक्रम पूर्ण केला जाणार असल्याचे पंचायत विभागाकडून सांगण्यात आले.
ग्रामपंचायतीचे वार्षिक कॅशबूक ऑनलाईन झाल्यास याचा फायदा आतापर्यंत सर्वसामान्यांनाही होणार आहे. एका क्लिकवर आपल्या ग्रामपंचायतीतील मागील आर्थिक वर्षात कोणत्या योजना आणि किती निधी आला होता, कोणत्या कामात किती खर्च झाला आदी माहिती उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ग्रामपंचायतीमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
बॉक्स
४४ ग्रामपंचायतींची प्रक्रिया पूर्ण
अचलपूर ५, चांदूर रेल्वे १, दर्यापूर ३, धारणी १८,मोर्शी १, नांदगाव खंडेश्वर १, तिवसा १, वरुड १४ अशा ४४ ग्रामपंचायतींनी ग्रामस्वराज उपक्रम पूर्णत्वास गेला आहे.
कोट
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक कॅशबूक ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८३९ पैकी ४४ ग्रामपंचायतींमध्ये काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये एप्रिलपर्यंत सदर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- दिलीप मानकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (ग्रामपंचायत)