अमरावती : यंदाचा खरीप आठवडाभरावर आला असताना राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का अद्याप १८ वरच आहे. त्यातुलनेत जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत ८० टक्केच कर्जवाटप केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
यंदाच्या खरिपासाठी दोन लाख शेतकऱ्यांना १,५०० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्यातुलनेत सध्या जिल्ह्यातील बँकांनी ५६,८६० शेतकऱ्यांना ५२१.८३ कोटींचे कर्जवाटप केले. ही ३५ टक्केवारी आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी १७,९८० शेतकऱ्यांना १९०.५५ कोटींचे कर्जवाटप केले आहे. ही १८ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांनी ४७६ शेतकऱ्यांना ५.४९ कोटींचे कर्जवाटप केले. ही ३१ टक्केवारी आहे. जिल्हा बँकेने मात्र, ३८,४१४ शेतकऱ्यांना ३२५.७९ कोटींचे कर्जवाटप केले. एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत ही ८० टक्केवारी आहे.
मंगळवारपासून मृग नक्षत्र सुरू होत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना पीककर्ज देणे महत्त्वाचे आहे. मात्र, राष्ट्रियीकृत बँकांद्वारा टाळाटाळ करण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
बॉक्स
असे आहे बँकनिहाय कर्जवाटप
बँक ऑफ बडोदा १०.९१ कोटी, बँक ऑफ इंडिया ७.५३ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र ५५.५५ कोटी, कॅनडा १.८९ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४२.७७ कोटी, इंडियन बँक ४.९१ कोटी, ओव्हसीज बँक ४९ लाख, पंजाब नॅशनल ९६ लाख, एसबीआय ५४.५८ कोटी, युको १३ लाख, युनियन बँक ५.३७ कोटी, ॲक्सिस बँक ४० लाख, एचडीएफसी ३.०५ कोटी, आयसीआयसीआय १.११ कोटी, आयडीबीआय ५६ कोटी, इडंसइंड बँक ३५ कोटी, विदर्भ कोकण बँक ५.४९ कोटी व जिल्हा बँकेद्वारा ३२५.७९ कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले आहेत.