अमरावती: एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना थेट खात्यावर प्रतिलाभार्थी १५० रुपये इतक्या रोख रकमेच्या हस्तांतरणाची योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत १४ पैकी ६ तालुक्यांतील २१ हजार ६० लाभार्थींना ९४ लाख ७७ हजार ६१० रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. मात्र, अजूनही आठ तालुक्यांतील पात्र असलेल्या लाभार्थींनी आपल्या अनुदानाच्या लाभासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रियाच पूर्ण केलेली नसल्याने असे एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थी अनुदानापासून दूर आहेत.
राज्य शासनाने एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांना यापुढे धान्याऐवजी प्रतिलाभार्थी १५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. जिल्हाभरात एपीएल शेतकरी कार्डधारकांची संख्या ९३ हजार ११९ एवढी आहे. यामध्ये आतापर्यंत पुरवठा विभागाकडे जिल्ह्यातील अचलपूर, अमरावती ग्रामीण, चांदूर बाजार, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या सहा तालुक्यांमधील २१ हजार ६० एपीएल शेतकरी लाभार्थींना जानेवारी ते मार्च २०२३ पर्यंतचे अनुदान शासनाकडून लाभार्थी रेशन कार्डधारकांच्या बँक खात्यात जमा केले, तर उर्वरित आठ तालुक्यांमध्ये मात्र लाभार्थींकडून योजनेच्या लाभासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया केली जात नसल्याने या तालुक्यांतील लाभार्थींना अनुदानाची रक्कम उपलब्ध असताना लाभ देता येत नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. या तालुक्यांत संथगतीने प्रक्रियाअमरावती शहर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, चिखलदरा, भातकुली, तिवसा, वरूड, मोर्शी, धारणी या नऊ तालुक्यांत लाभार्थींकडून लाभाच्या अनुदानासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. ही प्रक्रिया या ठिकाणी संथगतीने सुरू आहे. तालुकानिहाय लाभ मिळालेले कार्डधारक
- अचलपूर - २,६८९
- अमरावती ग्रामीण - १४
- चांदूर बाजार - ४,७२२
- दर्यापूर - ४,६८९
- धामणगाव रेल्वे - २,८८४
- नांदगाव खंडेश्वर - ६,०६२
एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांना शासनाने धान्याऐवजी प्रतिलाभार्थी १५० रुपये अनुदान जाहीर केले आहे. आतापर्यंत २१ हजारांवर लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींनी पुरवठा विभागाकडे रीतसर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा. डी.के. वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी