नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१६ टक्के पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती
अमरावती/ संदीप मानकर
मे महिन्यातील उन्हाच्या चटक्याने प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. यासंदर्भात २७ मेपर्यंतच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पांमध्ये फक्त २७.१८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा प्रथमच पाणीटंचाई जाणवली नसली तरी दोन आठवडे तरी पाण्याचा जपून वापर करावा लागणार असल्याचा अंदाज जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मान्सून अद्याप अंदमान-निकोबारपर्यंतच असला तरी विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी काही जिल्ह्यांमध्ये दररोज कोसळत आहेत. मान्सूनचा पाऊस १० जूननंतर दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला.
प्रकल्पांची स्थिती पाहिजे तशी चांगली नाही. पिण्याच्या पाण्याची जरी अद्याप कुठेची चिंता नसली तरी गतवर्षीसारखे प्रकल्प शंभर टक्के भरले, तरच पुढील वर्षी सिंचनाला व पिण्याच्या पाण्याची सोय होईल. पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २५ मध्यम व ४७७ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी २७.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये मोठ्या नऊ प्रकल्पांत सरासरी ३३.१६ टक्के, २५ मध्यम प्रकल्पात ३०.४९ टक्के, तर ४७७ लघु प्रकल्पांत फक्त १७.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अजून किमात दोन आठवडे पावसाची प्रतीक्षा आहे.
बॉक्स:
नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सर्वाधिक ४४.८६ टक्के पाणीसाठा आहे. ही अमरावती जिल्हाकरिता चांगली बाब आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २२.३५ टक्के, अरुणावती १९.६७ टक्के, बेंबळा प्रकल्प ३८.३३ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २९.०४ टक्के, वान ३५.९९ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २९.५४ टक्के, पेनटाकळी १९.८३ टक्के, तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
कोट
अंदमान-निकोबार निघून मान्सूनचा पाऊस सोमवारी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्व काही सुरळीत राहिल्यास विदर्भात तो १० जूननंतर पोहोचण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस कमी-जास्त प्रमाणात चालृू राहील. यंदा पाऊस चांगला आहे.
- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती.