अनुदान आयोगाचा निर्णय : विद्यार्थ्यांना मोठा दिलासाअमरावती : कोणत्याही शाखेची पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होणार आहे. विद्यापीठांतर्गत ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावरील प्रवेश यादीला ‘ब्रेक’ लागणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)ने निर्देश दिले आहेत.पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया यापूर्वी महाविद्यालय स्तरावर राबविली जायची. याकरिता विद्यापीठाची परवानगी महाविद्यालये घेत होते. परंतु केंद्रीय पद्धतीने हे प्रवेश व्हायचे नाहीत. यात बरेचदा महाविद्यालयीन व्यवस्थापनाचा हस्तक्षेप व्हायचा. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने पावले उचलली आहेत. देशातील सर्वच विद्यापीठांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या शैक्षणिक सत्रापासून पदवी प्रवेशासाठी एकच अर्ज सादर करावे लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यात अनुदानित महाविद्यालयांत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे १०० टक्के प्रवेश देणे अनिवार्य राहील. विनाअनुदानित महाविद्यालयांत ८० टक्के प्रवेश गुणवत्तेनुसार, तर २० टक्के जागांवरील प्रवेशाचे अधिकार व्यवस्थापन समितीला बहाल करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. नव्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी आता एकच अर्ज सादर करावा लागणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)अद्याप विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश दिलेले नाहीत. मात्र, तसे आदेश आल्यास त्वरेने कार्यवाही केली जाईल.- अजय देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
पदवी प्रवेशासाठी आता एकच अर्ज
By admin | Published: January 16, 2017 12:16 AM