अमरावती : राज्य शासनाच्या निर्देशानुसार शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ होती. मात्र, महिनाभरातनंतरही वनविभागानेबदलीस पात्र ४० उपवनसंरक्षकांच्या (आयएफएस) बदल्या केल्या नाहीत. आता बदली प्रक्रियेला केवळ सात दिवस शिल्लक असल्याने उपवनसंरक्षकांना बदलीची प्रतीक्षा आहे.
दरवर्षी मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया राबविली जाते. मात्र, यंदा राज्य सरकारने विशेष बाब म्हणून जूनपर्यंत शासकीयअधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ दिली. परिणामी प्रशासनाला बदली प्रक्रिया राबविताना थोडा दिलासा मिळाला. मात्र, वन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एककल्ली कारभारामुळे बदलीचा गोंधळ निस्तारत नसल्याचे चित्र आहे. खरे तर उपवनसंरक्षकांच्या बदल्यांना मुख्यमंत्री संमती देतात, त्यानंतर फाईल पुढे सरकते. मात्र, उपवनसंरक्षकांच्या बदल्यांबाबत काहीच घडामोडी दिसून येत नाही. ठाणे येथील जागेवरून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षकांच्या बदल्यांची फाईल थांबविल्याची विश्वसनीय माहिती आहे. उपवनसंरक्षकांच्या थांबलेल्या बदल्यांबाबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
७५ सहाय्यक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या
वन विभागात पदोन्नती समितीची बैठक झाली नसल्याने ७५ सहाय्यक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. तर दुसरीकडे एसीएफ यांना पदोन्नती मिळत नसल्याने ४५ विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. प्रभारी कारभार सुरु आहे. एसीएफच्या पदोन्नती अभावी ३५ आरएफओंकडे एसीएफचा प्रभार सोपविला आहे. सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, प्रशिक्षण व भरारी पथकात सहाय्यक वनसंरक्षकांची पदे नाहीत.
--