दर्यापूर : तालुक्यात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र १४,५६५ हेक्टर असून मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकांना अवेळी पावसामुळे फटका बसला. त्यामुळे सोयाबीन बियाणांची गुणवत्ता खराब झाली आहे. परिणामी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दर्यापूर तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक असून, सरासरी १० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. सद्यस्थितीत तालुक्यात शेतकऱ्यांकडे ६,६८८ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असून, ३,३१२ क्विंटल इतक्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन बियाणे उपलब्ध आहे, त्यांनी विक्री न करता घरचेच सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन बियाण्यांची पेरणी करताना उगवणक्षमता तपासूनच बियाणे पेरणी योग्य असल्याची खात्री करावी व जीवाणू संघाची बीज प्रक्रिया घ्यावी.
अशी करावी पेरणी
तीन – चार सेमी इतक्या खोलीवर करावी. पेरणी करताना ७५ – १०० मिमी इतका पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. सोयाबीन बियाण्यांची पेरणी करताना बीबीएफ तसेच पट्टा पध्दतीचा अवलंब केल्यास बियाण्याची बचत होईल. त्याचबरोबर उत्पादनात वाढ हेाते. किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणी योग्य समजावे. सोयाबीन हे स्वयं परागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी बाजारातून नवीन सोयाबीन बियाणे घेण्याची आवश्यकता नाही. पाऊस, कीड व रोग यामुळे बरेचदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते व पिकाच्या लागवडीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस उत्पादन वाढीबरोबरच उत्पादन खर्च कमी करणे ही काळाची गरज बनली आहे.
- तर उत्पादन खर्च कमी
घरचे सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासून वापरल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निश्चित कमी होईल. सोयाबीनचे बाह्य आवरण नाजूक व पातळ असल्यामुळे साठवणूक व हाताळणी दरम्यान तसेच पीक काढणीच्या अवस्थेत झालेल्या अवकाळी पावसामुळे बियाण्यांच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासूनच बियाण्यांची पेरणी करावी. तसेच पेरणी करतांना बियाण्याला बुरशीनाशक व जिवाणू संघाची बीज प्रक्रिया करावी.
कोट
पेरणीवेळी जमिनीत ७५ - १०० मिमी इतका पुरेसा ओलावा असल्यावरच पेरणी करावी. बियाणे तीन-चार सेंमी इतक्या खोलीवर पेरल्यास बियाण्यांची उगवण चांगली होईल.
- राजकुमार अडगोकर,
तालुका कृषी अधिकारी,
दर्यापूर