कु-हा : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने धार्मिक स्थळे व पूजाविधीचे कार्यक्रम बंद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र कौडण्यपूर येथील अस्थिघाटावर अस्थीपुजनासाठी व अन्य विधीसाठी केवळ तीनच व्यक्तींना ग्रामपंचायतमार्फत परवानगी देण्यात येणार आहे.
येथील अस्थीघाटावर पूजाविधी व अस्थी विर्सजन करण्यासाठी दुरदुरुन नागरिक येतात. यामध्ये कोरोना रुग्णांच्या अस्थी सुद्धा याच ठिकाणी आणल्या जातात. तसेच अस्थिघाटावर नागरिकांची गर्दी देखील वाढतीच आहे. याच पार्श्वभूमीवर १६ एप्रिल रोजी कौडण्यपूर ग्रामपंचायतचे सचिव पी. पी. पाचघरे व कु-हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामप्रशासनामार्फत पुढील दोन दिवस कठोर नियमावली जारी करण्यात आली. त्यानुसार कौडण्यपूर अस्थीघाटावर फक्त तीन व्यक्तींना अस्थीपूजनासाठी किंवा धार्मिक विधीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसेच पुढील २ दिवस नागरिकांनी जर या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई व अस्थीघाट पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.