फोटो - १४एएमपीएच०४, १४एएमपीएच०५, १४एएमपीएच०६
कॅप्शन - चंदन झाडाचा पंचनामा करताना वनविभागाची चमू
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तस्करांनी गाभ्याचा भाग पळविला, सुरक्षा रक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह, गाडगेनगर पोलिसांत तक्रार
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक आणि वनविभाग (प्रादेशिक) उपवनसंरक्षक अशा दोन वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयानजीक असलेल्या चक्क दोन चंदन झाडांची कत्तल करून गाभ्याचा भाग पळविल्याची घटना सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. तीन तस्करांनी चंदन झाडांची कत्तल केल्याचे सीसीटीव्हीने टिपले आहे. विशेष म्हणजे, चंदन तस्करांची ही टोळी मराठवाड्यातील असल्याची माहिती वनखात्यातीलच सूत्रांनी दिली असून टोळीतील सदस्य दिवसा झाडांची रेकी करतात आणि रात्री त्यांची कत्तल करतात.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प संकुल परिसराच्या वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. जयस्वाल यांनी गाडगेनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी आणि वनविभाग (प्रादेशिक) चंद्रशेखर बाला यांच्या कार्यालय परिसरातील दोन चंदनाची झाडे कापल्याची माहिती सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लक्षात आली. यासंदर्भात परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे तिघेही चोरटे कैद झाल्याचे नमूद आहे. सीसीटीव्ही तपासले असता तीन अज्ञात इसमांनी कार्याआयोजना उपवनसंरक्षक कार्यालयाच्या भागातून प्रवेश केला. चंदन झाडांची आवाजविरहित यंत्राने कत्तल केली आणि लाकूड कापून वाहतूक केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चंदन झाडाचा मुख्य गाभा चोरट्यांनी पळविला आहे. उर्वरित लाकूड जागेवर सोडून तस्करांनी पळ काढला. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात वनपाल श्याम देशमुख, सुनील टिकले, चंद्रकांत चोले, ओंकार भुरे, प्रशांत खाडे यांनी पंचनामा करून लाकूड, फांद्या ताब्यात घेतल्या आहेत.
--------------
कोट
दोन चंदनाची झाडे अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना निदर्शनास आले आहे. याप्रकरणी पंचनामा झाला असून, नेमके किती किमतीची ही झाडे होती, हे अहवालानंतरच स्पष्ट होईल.
- जयोती बॅनर्जी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प
--------------
२० दिवसांपूर्वी जिल्हा कचेरीतूनही तस्करी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बगीचातून २५ मे रोजी एका चंदनाच्या झाडाची कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी आशिष अंबाडकर यांनी गाडगेनगर पोलिसांत २६ मे रोजी तक्रार दिली. यापूर्वीदेखील जिल्हा परिषद, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, विभागीय आयुक्त, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक यांच्या बंगल्यातून चंदन झाडांची कत्तल करण्यात आली, हे विशेष.