(फोटो/मोहोड/मेल)
अमरावती : जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना हृदयरोग, कर्करोगासारख्या मोठ्या आजारांवर तत्काळ वैद्यकीय उपचार सुविधा मिळावी, यासाठी जिल्हा राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात हृदयरोग व कर्करोगासंबंधी निदान व उपचारासाठी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपीडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांनी येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी केले.
शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील श्री गजानन महाराज व साई महाराज मंदिरामागील परिसरात स्थापित कर्करोग व हृदयरोग ओपीडीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण सोनवणे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. वैभव चौधरी यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हृदयरोग व कर्करोगासारख्या मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना नागपूर, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात जावे लागते. आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठीचा खर्च त्यांना परवडण्याजोगा नसतो. अशा रुग्णांना जिल्ह्यातच तपासणी व उपचार सुविधा मिळाली, तर ते त्यांना सोईचे होते. यासाठी शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिनस्थ हृदयरोग व कर्करोग आजाराची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. रुग्णांनी या ठिकाणी सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार आदी घ्यावेत. गोरगरीब रुग्णांना आवश्यक उपचार करण्यासाठी महात्मा जोतीराव जीवनदायी योजनेचा लाभसुद्धा देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
आरोग्य केंद्रात कर्करोगावर वैद्यकीय उपचार युनिट हे तीन वर्षांपासून कार्यरत आहे. याठिकाणी आता नव्याने हृदयरोगासंबंधी ओपीडी सुरू झाल्याने अनेक रुग्णांना उपचार घेणे सोईचे होणार आहे. या दोन्ही ओपीडी यंत्रसामग्री व औषधींनी सुसज्ज असून, अधिपरिचारिका हरीश काटकर, सुषमा मोहिते, पल्लवी पेठे, डेटा एन्ट्री ऑपरेटर अमित देशमुख व इतर कर्मचारी याठिकाणी रुग्णांना आरोग्य सेवा, सुविधा पुरवितात.
बॉक्स
अशी मिळणार सुविधा
जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करण्यात या बाहृयरुग्ण विभागाला हृदयरोग आजारासंबंधी डॉ. भूषण सोनवणे तपासणी करणार असून, दर सोमवारी व गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ओपीडी सुरू राहील. कर्करोग आजारासंबंधी डॉ. वैभव चौधरी तपासणी करणार असून, त्यांची ओपीडी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यातील हृदयरोग व कर्करोग आजाराच्या रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.