अनलॉक, तरीही मंदिरे बंदच, भक्तांना कळस दर्शनावर समाधान, प्रांगणातील किरकोळ विक्रेत्यांचे गणित बिघडलेलेच
अमरावती : कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने राज्य शासनाने संचारबंदीचे निर्बंध शिथिल केले. मात्र, मंदिराची दारे भक्तांसाठी अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे गाभाऱ्यात नतमस्तक होऊन इष्टदेवतेची मूर्ती डोळ्यांत साठवण्याची इच्छेला मुरड घालून भाविकांना शेवटच्या पायरीवरून कळसाचे दर्शन घ्यावे लागत आहे. भाविकांअभावी शुकशुकाट असल्याने मंदिराच्या प्रांगणात हार-फुले, प्रसाद विक्रीचा किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांचे बिघडलेले आर्थिक गणित अद्याप सावरलेले नाही.
अमरावतीत अंबादेवी, एकवीरा देवी, साईबाबा, गजानन महाराज, श्री बालाजी, कालीमाता, श्रीकृष्ण, मारुती, भगवान शंकर, विठ्ठल-रुखमाई, स्वामी समर्थ अशा विविध देवतांची मोठी मंदिरे तसेच सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे व सभागृह आहेत. मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. तिथीनुसार दिवसभर रांगा असतात. मात्र, गत दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. परिणामी मंदिरे आता कधी खुली होणार, याकडे भक्तांसह हार, प्रसाद विक्रेते, पुजाऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
--------------------
किती दिवस कळसाचे दर्शन?
कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरल्यानंतर अनेक धार्मिक स्थळे, सामूहिक आयोजनांच्या ठिकाणी गर्दी झाली होती. परिणामी दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहावयास मिळाला. आताही आम्हा भक्तांना देवाच्या भेटीची ओढ लागली आहे. परंतु, शासनाच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. मंदिरे कधी खुली होणार, याकडे लक्ष लागले आहे.
- प्रसाद देशपांडे, भाविक
शासन नियमांच्या आदरच..
मंदिर बंद असले तरी सकाळ, सायंकाळ नियमित गर्भगृहातील देवीची पूजा-अर्चा केली जाते. शुकशुकाट जाणवतो, पण कोरोना नियमांचे पालन करणे आणि शासन नियमांचा आदर करणे आवश्यक आहे. भाविक बाहेरूनच देवाचे दर्शन घेतात. नवीन वाहनांचे मंदिराबाहेर पूजन करण्यासाठी आपली वाहने घेऊन येतात.
- राम गढीकर, पुजारी, श्री अंबादेवी मंदिर
------------
आर्थिक गणित कोलमडले
मंदिरात येणाऱ्या भक्तांवरच व्यवसाय अवलंबून आहे. मागील दीड वर्षांपासून व्यवसाय ठप्प पडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सरकारने आमच्या व्यथांकडे लक्ष द्यावे तसेच मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी.
- संतोष वर्मा, प्रसाद व फ्रेम विक्रेता
------------
मंदिरे लवकर सुरू करावी
हार-फुलांचा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. याच व्यवसायावर उपजिविका अवलंबून आहे. मंदिरे बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने मंदिरे उघडण्याची मागणी पूर्ण करावी.
- मंगेश उकडे, हार विक्रेता