अमरावती : गृहविभागाच्या निर्णयानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहात ५० बंदी संख्या क्षमतेचे सुरु करण्यात आलेल्या खुल्या कारागृहाची इमारत अद्यापही साकारण्यात आलेली नाही. जुन्याच कारागृहात कारभार सुरु असून या बंदीजणांना खुले कारागृहाची नियमावली केवळ कागदोपत्रीच सुरु असल्याचे दिसून येते.गृहविभागाने राज्यात मध्यवर्ती कारागृहांच्या ठिकाणी ५० बंदी क्षमतेचे खुले कारागृह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अमरावतीत १२ डिसेंबर २०१३ रोजी खुले कारागृह सुरु करण्यात आले. या कारागृहाच्या निर्मितीसाठी लागणारी इमारत, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, बराकी आदींचा नकाशा मंजूर करुन त्याकरिता लागणाऱ्या निधीबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. खुले कारागृह सुरु होऊन ११ महिन्यांचा कालावधी लोटला असताना बांधकामासाठी लागणारा निधी शासनाने पाठविला नाही. परिणामी खुले कारागृहाचा कारभार जुन्याच मध्यवर्ती कारागृहातून चालविला जात आहे. खुले कारागृहाची नियमावली ५० बंद्यासाठी लागू करण्यात आली आहे. मात्र या बंदीजणांना जुन्याच बरकीत ठेवले जात आहे. त्यांच्याकडून केवळ शेतीची कामे करुन घेतली जात आहे. या बंदीजणांना स्वतंत्र इमारत निर्माण झाल्याशिवाय खुले कारागृहाच्या सोई सुविधा मिळणे अशक्य असल्याचे चित्र आहे. खुले कारागृहाचा स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी इमारत बांधकाम, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाने त्वरित द्यावा, याकरिता कारागृहाच्या अधीक्षकांनी प्रस्ताव पाठविले आहे. निधीअभावी खुले कारागृहाचे एकूणच प्रकरण थंडबस्त्यात पडले आहे. मात्र शासन नियमानुसार खुले कारागृह सुरु करण्याचे कसब प्रशासनाने केले आहे. ५० बंद्याना दररोज सकाळ ते सायंकाळपर्यंत खुले कारागृहाच्या नियमानुसार कामकाज चालवून सूर्यास्त होताच त्यांना मध्यवर्ती कारागृहांच्या बराकीत ठेवले जात आहे. खुले कारागृहांच्या सोईसुविधा या कागदोपत्रीच सुरु असल्यामुळे अनेक बंदीजणांमध्ये कमालीची नाराजी पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)
खुले कारागृह सुरु; स्वतंत्र कारभार केव्हा?
By admin | Published: November 30, 2014 10:57 PM