खातेप्रमुखांना उपस्थितीचे आदेश
अमरावती : कठोर संचारबंदीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारातील विविध विभागांची कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ७ मे रोजी दिले होते. मात्र, १७ मे रोजी जिल्हा परिषदेतील बंद असलेल्या सर्व विभागांचे टाळे उघडण्यात आले. विशेष म्हणजे, सर्व विभागप्रमुखांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश १५ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख कार्यालयात हजर असल्याचे दिसून आले. तथापि, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत सध्या कुठल्याही सूचना नसल्याने अनेक विभागांत शुकशुकाट दिसून आला.
जिल्हा परिषदेतील आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत विभागासह ग्रामपंचायत या विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना संचारबंदीच्या काळातही कर्तव्यावर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, इतर विभाग मात्र बंद होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारीही घरीच होते. अशातच आता प्रशासकीय विभाग जरी उघडे असले तरी कार्यालयात संबंधित खातेप्रमुखांशिवाय कुणीही हजर नाही, हे विशेष.
बॉक्स
अभ्यासगतांनाही ‘नो एन्ट्री’
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांनाही मुख्यालयास प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. विभागाप्रमुखांकडे कामासंदर्भात द्यायची निवेदने, तक्रारी या जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या ई-मेलवर किंवा व्हॉट्सॲपवर पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.