अमरावती : शहरातील खुली भूखंड गटारी बनल्याने अस्वच्छतेत भर पडली आहे. अशा खुल्या भूखंडाची स्वच्छता स्वत:हून करवून घ्यावी, अन्यथा महापालिका स्वच्छ करेल, मात्र येणारा खर्च दंड म्हणून वसूल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला होता. अशा ४०० पेक्षा अधिक भूखंडधारकांना नोटीस देखील बजावण्यात आल्या. त्या नोटीसला न जुमाणणाऱ्या राजापेठ, दरोगा प्लॉट येथील दोन भूखंडधारकाविरूध्द राजापेठ पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली.
पावसाळ्याचे दिवस व साथरोगांची लक्षणे पाहता महापालिका क्षेत्रातील खुल्या भूखंडधारकांनी सात दिवसांच्या आत कचरा काढून भूखंड स्वच्छ करून घ्यावेत, अन्यथा त्यासाठी आलेल्या खर्चाची वसुली भूखंडधारकांकडून करण्यात येईल. याबाबत झोन स्तरावरून कार्यवाही करण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार, स्वच्छता विभागाकडून ४०० पेक्षा नोटीस बजावण्यात आल्या. त्या मालिकेत राजापेठ भागातील दोघांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही संबंधितांच्या भुखंडात कचरा,झाडेझुडपे, साचलेले पाण्याचे डबके जैस थे असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे संबंधितांविरूध्द फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करण्यात आली.
महापालिका करेल स्वच्छनोटीसला न जुमानणाऱ्या भूखंडधारकांची खुली भूखंडे महापालिका स्वच्छ करेल. त्यासाठी येणारा खर्च दंड म्हणून आकारण्यात येईल. त्याअनुषंगाने अमरावतीकरांनी शहर स्वच्छ व सुंदर राहण्याच्या दृष्टीने सहकार्य करून दंडात्मक कार्यवाही टाळण्याची आवाहन महापालिका आयुक्त देविदास पवार व विशेष कार्य अधिकारी डॉ. सीमा नैताम यांनी केले आहे.