रोज निघतात सरपटणारे प्राणी, गुरांचा हैदोस आणि सर्वत्र सांडपाणी, नगर परिषदेच्या नोटीसला केराची टोपली
वरूड :- शहरातील बाह्यवस्तीमध्ये अनेक ले-आऊट रिकामे असून त्यावर झाडेझुडपे वाढली आहेत. पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर येथे असून, एरवी सांडपाण्याचे डबके तयार होत असल्याने मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नगर परिषदेने दोन वेळा बजावलेल्या नोटीसना प्लॉटमालकांनी केराची टोपली दाखविली आहे.
स्थानिक साई सहवास कॉलनी, कृष्णार्पण कॉलनी, विजयनगर, विठ्ठलनगरी, पिंगलानगर, मुल्ताई रोडवरील परिसर, एनटीआर शाळा परिसर, पार्डी रोड, रिंग रोडच्या बाजूच्या कॉलनी, साई मंदिर परिसरासह शहरातील असलेल्या सर्वच ले-आऊटमध्ये कुठे ४०, तर कुठे ७० टक्के भूखंड केवळ गुंतवणूक म्हणून घेतल्याने रिकामे आहेत. रस्ते नाल्या झाडाझुडपांनी वेढल्या असून, गुरांचा वावर असतो. सांडपाणीसुद्धा साचल्याने डेंग्यूच्या डासांची उतत्तिस्थळे झाले आहेत. एक हजार ते दोन हजार चौरस फुटांपर्यंत भूखंड रिकामे आहेत. या पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असतो तसेच अनेक वेळा साप, विंचू चावल्याच्या घटना घडतात. महिला, बालकांना नागरिकांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. काही ले-आऊटमधील व्यायामासह खेळण्याचे साहित्यसुद्धा गायब झाले आहे. नगर परिषदेने वेळोवेळी रिकामे भूखंड असलेल्या मालकांना नोटीस दिल्या. परंतु, नगर परिषदेच्या पत्रांना केराची टोपली दाखविली जात आहे. साथरोगाने तोंड वर काढल्यास डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप होण्यास वेळ लागणार नसल्याने वेळीच दाखल घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
----------------------
शहरातील ले-आऊटमध्ये रिकामे असलेल्या भूखंडापासून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जीविताससुद्धा धोका निर्माण होतो. घाणीचे साम्राज्य होऊन साथरोगाला आमंत्रण देणारा प्रकरार असल्याने संबंधित भूखंडधारकांना दोन वेळा नोटीस दिल्या. आता थेट कारवाई करणार आहे.
- रवींद्र पाटील, मुख्याधिकारी