अमरावती - सात वर्षांपासून रखडलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयास अखेर मुहूर्त सापडला. कामगार मंत्री संजय कुटे यांच्या प्रयत्नांतून अमरावतीला हे विभागीय कार्यालय उपलब्ध झाले आहे. १४ सप्टेंबरला या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. याचा अमरावती विभागातील ४५ लाख ३८ हजार १८ कामगारांना लाभ होणार आहे. यापूर्वी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील कामगारांना त्यांच्या समस्यांचे निराकरणासाठी नागपूर येथील कार्यालयात जावे लागत होते. साधारणत: १५० ते ४५० किमी प्रवासभाडे व किमान दोन दिवसांचा वेळ यात खर्च व्हायचा. आता अमरावतीलाच कार्यालय झाल्याने कामगारांचा वेळ व पैसा वाचणार आहे. कामगार उपायुक्त कार्यालयासाठी संवर्ग ‘अ’ मधील उपायुक्त, संवर्ग ‘ब’ मधील दोन सहायक कामगार आयुक्त, चार सरकारी कामगार अधिकारी यांच्यासह ३३ कर्मचारी असा एकूण ४० शासकीय अधिकारी व कार्मचारी मनुष्यबळ या कार्यालयास उपलब्ध करण्यात आलेले आहे. अमरावती विभागात या कार्यालयांतर्गत ६४१ कारखाने आणि १ लाख १७ हजार ४५ वाणिज्यिक आस्थापना आहेत. या कारखान्यात ६० हजार २८२ कामगार वाणिज्यिक आस्थापनेतील ७९ हजार ८२७ कामगार व असंघटित क्षेत्रातील ४३ लाख ९७ हजार ९०९ कामगार आहेत. याशिवाय पाच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र माथाडी व असंघटित कामगार मंडळे कार्यरत आहेत. याशिवाय अमरावती जिल्हा सुरक्षा मंडळ अमरावती कार्यालयाच्या अखत्यारित पाचही जिल्हे येतात. यामध्ये सन २०१३ पासून १८४८ सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ अंतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये ४५ हजार ४५१ कामगारांची नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत पाचही जिल्ह्यांतील २ लाख २७ हजार ७३१ बांधकाम कामगारांचीदेखील नोंदणी झालेली आहे. या सर्व कामगारांना याचा लाभ होणार आहे.
ना. संजय कुटे यांच्या निर्णयाची अंमलबजावणीविभागविषयक धोरणानुसार सन २०१२ मध्ये अमरावती येथे विभागीय कामगार उपायुक्त कार्यालय स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विभागातील कामगारांची मोठी अडचण निर्माण झाली होती. ना. कुटे यांनी पदभार स्वीकारताच अमरावतीत विभागीय कामगार उपायुक्त कार्यालय अस्तित्वात आणण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यात आला. याचा ४५ लाखांवर कामगारांना दिलासा मिळाला आहे. कार्यालयाचा उद्घाटन सोहळा ना. कुटे यांच्या हस्ते आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत शनिवारी होत आहे.