लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटात विपुल वनसामग्री आहे. या क्षेत्रात शासकीय जमिनीवर चराईक्षेत्र निर्माण करून अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन घेता येते. त्यासाठी येथील नागरिकांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे वळल्यास उपजिविकेचे उत्तम साधन होईल, असे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी सांगितले.सामूहिक वनहक्काचे संवर्धन व व्यवस्थापन आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कर्न्व्हजन्स समितीसह नवसंजीवनी योजनेची आढावा बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली धारणी येथील उपविभागीय कार्यालयात बुधवारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजय राठोड, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीणा, सिपना वन्यजीव कार्यालयाचे उपवनसंरक्षक सुनील शर्मा आदी उपस्थित होते.मेळघाट क्षेत्रात मदर डेअरीचे प्रकल्प स्थापित करण्यासाठी धारणी व चिखलदरा तालुक्यातील गावांचा सर्वे करून दूध संकलन केंद्र कुठे स्थापन करता येईल, याची पाहणी करावी. जिल्ह्यात मदर डेअरी प्रकल्पासाठी दोन क्लस्टर मंजूर झाली आहेत. हरिसाल, उपातखेडा, नयाखेडा, अचलपूर, तिवसा येथे दूध संकलन केंद्र स्थापन करण्यासाठी गावकºयांशी संपर्क करून केंद्रस्थळ निश्चित करावे. पशुसंवर्धन विभागाने शेतकºयांना जातीवंत वळू उपलब्ध करून द्यावे. शासकीय तसेच वन विभागाच्या जमीनीवर चराई क्षेत्र निर्माण करण्यासाठी आफ्रीकन गवताचे व इतर झाडांचे बीज शेतकºयांना उपलब्ध करून द्यावे.शौचालय बांधकामासाठी २६ जानेवारी डेडलाईनमहिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागाने प्रत्येक योजनांचा लाभ येथील गरोदर माता व नवजात बालकांना द्यावा. वन विभागाने शामाप्रसाद मुखर्जी योजनेतंर्गत सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांतील शौचालय बांधकामाची कामे २६ जानेवारी पर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
मेळघाटात दुग्धोत्पादन वाढविण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:23 AM
मेळघाटात विपुल वनसामग्री आहे. या क्षेत्रात शासकीय जमिनीवर चराईक्षेत्र निर्माण करून अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन घेता येते.
ठळक मुद्देविभागीय आयुक्त : नवसंजीवनी योजनेचा आढावा