अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी १७ नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
राज्य मंडळाने याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील अनेक विद्यार्थी १७ नंबरचा अर्ज भरून दहावी-बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होतात. त्याप्रमाणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अनेक विद्यार्थी काम करतात. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षण घेता येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची परीक्षा देता यावी, याकरिता शिक्षण मंडळाकडून परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्याची संधी दिली जाते. त्यासाठी या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज आणि शुल्क भरावे लागते. राज्य मंडळाकडून परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना १६ नोव्हेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरावयाचे आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज शुल्क भरण्याची पावती दोन प्रतीत मूळ कागदपत्रे १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत निवडलेल्या शाळा किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये जमा करावयाची आहेत. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज शिवकांची पावती मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय शिक्षण मंडळाकडे १८ ऑक्टोबरला जमा करावयाची आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीचा निकाल जुलै-ऑगस्टमध्ये जाहीर झाला. त्यामुळे ऑनलाईन अर्ज नोंदणी शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील तारीख ३१ ऑगस्ट २०२१ अशी ग्राह्य धरण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.