अमरावती : सध्या राज्यात राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यसभा १० जून तर विधानपरिषदेची निवडणूक २० जून रोजी होऊ घातली आहे. विशेष म्हणजे भाजपने राज्यसभेसाठी माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि विधान परिषदेसाठी श्रीकांत भारतीय यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे डॉ. बोंडे व भारतीय यांच्या कार्यक्षेत्राने राजकीय गवसणी घातल्याने अमरावतीसाठी अच्छे दिन मानले जात आहेत.
भाजपने बुधवारी पाच नावे विधानपरिषद निवडणुकीसाठी जाहीर केली असून, यात अमरावतीचे श्रीकांत भारतीय यांच्या नावाचा समावेश आहे. श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना श्रीकांत भारतीय हे त्यांचे ओएसडी होते. ते भाजपच्या किसान मोर्चाच्या कार्यकारिणीत सदस्य आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकीत भारतीय हे भाजपच्या वॉर रूमचे प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
भारतीय हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. अभाविप या विद्यार्थी चळवळीतून त्यांचा सामाजिक, राजकीय प्रवास आहे. १९८९ साली आसाम येथे अल्फा व बोडो चळवळीचा त्यांनी अभ्यास केला. १९९३ साली प्राध्यापक व पत्रकार म्हणून त्यांनी काम केले. १८ वर्षे वयावरील अनाथांसाठी काम करणाऱ्या तर्पण फाउंडेशनचे श्रीकांत भारतीय हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. १९९४ पासून भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. भाजपने एका तपानंतर कार्यकर्ता असलेल्या श्रीकांत भारतीय यांच्या रूपाने अमरावतीला विधानपरिषदेचे सदस्य दिल्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक पोकळी भरून निघेल अशी अपेक्षा अंबानगरीवासी करीत आहेत.