रिद्धपूर : मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथील वॉर्ड क्र. ४ मधील दलित वस्तीतील देशी दारुच्या दुकानामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने हे वादग्रस्त दारुचे दुकान गावाबाहेर नेण्याच्या मागणीसाठी नागरिक व महिलांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. येथील वॉर्ड क्र. ४ मधील दलित वस्तीतील देशी दारुचे दुकानाविरुद्ध परिसरातील महिलांनी व नागरिकांनी दंड थोपटले आहे. दारू दुकानदार व त्यांचे नोकर हे दुकान सकाळी ९ च्या अगोदर उघडून दारू विक्री करतात. त्यामुळे सकाळपासूनच दारूडे या परिसरात फिरताना आढळतात. ये-जा करणाऱ्या महिला व मुलींचा विचार न करता कुठेही लघुशंका करणे, संभाषण करून धुमाकूळ घालणे यामुळे परिसरातील संतप्त महिला व नागरिकांनी जिल्हाधिकारी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, अधीक्षक अमरावती ग्रामीण पोलीस व रिद्धपूर ग्रामपंचायतीला देशी दारूचे दुकान ८ दिवसांत हटविण्याची मागणी केली आहे, अन्यथा येथील महिला व नागरिकांनी देशी दारू दुकानाविरुद्ध उपोषणाचा इशारा दिला आहे. शासकीय नियमांना डावलून दारु विक्री करणाऱ्या दुकानाजवळच सार्वजनिक पाण्याची विहीर आहे. या विहिरीवरून पाणी भरण्याकरिता मोठ्या प्रमाणात महिला येतात. परंतु दारूडे मात्र अश्लील शिवीगाळ करीत असल्याने महिलांची कुचंबना होते. दारू दुकानाच्या काही अंतरावरच बुद्धविहार व लहान मुलांची अंगणवाडी आहे. हनुमान मंदिरसुद्धा आहे. यामुळे या विभागातून नागरिक, महिला, विद्यार्थी सतत या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. परिसरातील मुलांना या दारू दुकानातील गोंधळामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या परिसरातील मुलांचे भविष्य अंधारमय होणार आहे. या दुकानामुळे आम्हाला आमचे घराचे दरवाजे बंद करून राहावे लागते. देशी दारूचे दुकान मध्यवस्तीत असल्यामुळे बरेच लोक दारूच्या आहारी जात असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर वाईट परिणाम होत आहे. या दुकानामुळे होणाऱ्या घडामोडींमध्ये कोणत्याही क्षणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुसूचित प्रकार घडू शकतो. यापूर्वी सुद्धा रिद्धपूर ग्रामपंचायतला बरेच निवेदने दिलेली असून त्याची प्रत राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवून या गंभीर विषयावर आजपर्यंत संबंधित विभागामार्फत आजपर्यंत या गंभीर विषयावर आजपर्यंत चौकशी सुद्धा केली नाही. महिलांना व नागरिकांना दुकानासमोरील दारुड्याचा होणारा त्रास बघता सदर दारू दुकानाविरोधात आठ दिवसाच्या आत दारू दुकान हटविण्याची कार्यवाही केली नाही तर वेळ पडल्यास उपोषण करण्याचा निर्णय येथील महिलांनी तसेच नागरिकांनी घेतल्यामुळे शासन याबाबत काय कारवाई करते याकडे रिद्धपुरातील नागरिकांचे व महिलांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
देशी दारू दुकानाला विरोध
By admin | Published: January 31, 2015 12:58 AM