अमरावती - एनआरसी, सीएए आणि एनपीआर या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी बंद पुकारला. यावेळी एका व्यापारी प्रतिष्ठानावर दगड भिरकावल्याने अमरावतीपोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान प्रचंड खळबळ उडाली. लाठीचार्जमध्ये पाच आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी १५ आंदोलकांना 'डिटेन' केले. शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात पुकारलेल्या बंददरम्यान शहरातील काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली. यादरम्यान इर्विन चौकात एकत्र झालेल्या आंदोलकांनी नारेबारी करीत उघडी प्रतिष्ठाने बंद करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी एका आंदोलकाने व्यापारी प्रतिष्ठानावर दगड भिरकावला. यावेळी त्या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने आंदोलक सैरावैरा पळाले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
काही संतप्त आंदोलकांनी नारेबाजी करीत शहराकडे कूच केली. त्यामुळे पोलिसांनी लाठ्यांचा धाक दाखवून आंदोलकांना ताब्यात घेतले. लाठीचार्जमध्ये पाच आंदोलक जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेनंतर आंदोलकांमध्ये पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त होताना दिसून आला.