अमरावती : जिल्ह्यात तीन पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. विरोधकांनी सभेच्या अजेंडावर असलेल्या विषयांवर आक्षेप नोंदविला होता. मात्र या सभेत विरोधकांचा हा आक्षेप मोडून काढत सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली. धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्र्वर या दोन पंचायत समितीमधील सात विकास कामांना स्थायी समितीची मंजुरी घेण्यासाठी जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा बोलविण्यात आली होती. यामध्ये तळणी-कासारखेड रस्त्याची पूरहाणीमुळे दुरूस्ती करणे, नांदगाव-सातरगाव रस्त्याची दुरूस्ती करणे, दाभा-निभोरा, शेलुगुडी-हिंगलासपूर, दिघी महल्ले ते बोरगाव निस्ताने, अशोकनगर ते गव्हाफरकाडे आणिउसळगव्हाण पोच मार्गाची दुरूस्ती करणे आदी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी देण्यासाठी ही सभा अध्यक्षांनी बोलविली होती. पंचायती समिती निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने या विकास कामांच्या मंजुरीवर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला होता.
स्थायी समितीच्या सभेत विरोधकांचा फसला डाव
By admin | Published: November 25, 2014 10:47 PM